सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानिमित्त काढण्‍यात आलेल्‍या रथोत्‍सवाचे सूक्ष्म परीक्षण आणि साधकांना झालेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाचे ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्‍याचा ब्रह्मांड मंडलावर झालेला परिणाम !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ. ब्रह्मोत्‍सवाच्‍या कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्‍यामुळे उपस्‍थित सर्वांनाच उष्‍णतेचा त्रास होणे : ‘फार्मागुडी (फोंडा, गोवा) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या प्रांगणात दुपारी ४ वाजता सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या, म्‍हणजेच ब्रह्मोत्‍सवाच्‍या कार्यक्रमाचा आरंभ झाला. कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्‍यामुळे कडक ऊन होते. त्‍यामुळे उपस्‍थित सर्वांनाच उष्‍णतेचा त्रास होत होता.

१ आ. रथारूढ  सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होताच वातावरणात पालट होणे : कार्यक्रमस्‍थळी रथासाठी वेगळा मंडप सिद्ध केला होता. ‘कार्यक्रमापूर्वी रथ दिसू नये’, यासाठी मंडपाला पडदा लावण्‍यात आला होता. अनुमाने ४.४० वाजता रथ असलेल्‍या मंडपाचा पडदा सरकवला आणि उपस्‍थित सर्वांना रथारूढ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. तिन्‍ही गुरूंनी समष्‍टीला दर्शन देताच एकाएकी वातावरणात पालट झाला. अकस्‍मात् थंड वारा वाहू लागून उन्‍हाचा प्रखरपणा न्‍यून झाला आणि आकाशाचा रंग अधिक फिकट झाला. या वेळी कार्यक्रमाच्‍या ठिकाणी स्‍थुलातून सूक्ष्म गंध अनुभवता येत होता. ‘जणू पंचतत्त्वांपैकी पृथ्‍वी, सूर्य (तेज), पवन (वायू) आणि गगन (आकाश) ही सर्व तत्त्वे आपतत्त्वरूपी कार्यक्रमस्‍थळीच्‍या प्रांगणात, म्‍हणजे क्षीरसागरात तिन्‍ही गुरूंचे स्‍वागत करत असून ती पंचतत्त्वे त्‍यांचे दर्शन अन् सेवा यांसाठी व्‍याकुळ झाली आहेत’, असे मला जाणवले. (हे लिखाण करतांनाही बाहेरील वातावरणात असेच पालट झाले. लिखाण पूर्ण झाल्‍यावर पुन्‍हा कडक ऊन आले. – संकलक)

१ इ. ब्रह्मोत्‍सवाचे चैतन्‍य ब्रह्मांड मंडलापर्यंत कार्यरत होत असल्‍याने समष्‍टीला पंचतत्त्वांच्‍या विविध रूपांशी निगडित स्‍थुलातील प्रचीती मिळणे आणि त्‍यातून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या आध्‍यात्मिक क्षमतेचे वैशिष्‍ट्य अनुभवणे : या संदर्भात ईश्‍वराने मला सांगितले, ‘आतापर्यंत सत्‍संग सोहळे, यज्ञ अशा समष्‍टी कार्यक्रमांमध्‍ये साधकांना ‘वरुणाशीर्वाद (काही काळासाठी थोडा पाऊस पडणे)’ मिळाल्‍याची अनुभूती आली आहे. समष्‍टी कार्यक्रमाचे चैतन्‍य वायूमंडलापर्यंत कार्यरत होते. तेव्‍हा पंचतत्त्वांपैकी एका विशिष्‍ट तत्त्वाची अनुभूती येते; याउलट आजच्‍या कार्यक्रमाचे चैतन्‍य ब्रह्मांड मंडलापर्यंत कार्यरत होते, तेव्‍हा पंचतत्त्वांशी निगडित एकाहून अधिक तत्त्वांची अनुभूती येते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ व्‍या ब्रह्मोत्‍सवाचे चैतन्‍य ब्रह्मांड मंडलापर्यंत कार्यरत होत असल्‍याने समष्‍टीला पंचतत्त्वांच्‍या विविध रूपांशी निगडित स्‍थुलातील प्रचीती मिळत आहे. ब्रह्मोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या आध्‍यात्मिक क्षमतेचे आगळे वेगळे वैशिष्‍ट्य समष्‍टीला अनुभवता येत आहे.’

२. ‘सोनेरी प्रकाशाच्‍या माध्‍यमातून वैकुंठातून नारायण भूतलावर येत आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि त्‍यानंतर समष्‍टीला रथारूढ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दर्शन देणे

‘काही क्षणांतच कार्यक्रम चालू होईल’, अशी उद़्‍घोषणा झाल्‍यानंतर मी डोळे मिटले, तेव्‍हा सूक्ष्मातून मला पुढील दृश्‍य दिसले, ‘वैकुंठातून (निर्गुणातून) सोनेरी रंगाचा प्रकाशझोत कार्यक्रमस्‍थळी रथासाठी ठेवलेल्‍या मंडपाच्‍या ठिकाणी पडत आहे. त्‍या प्रकाशझोतातून श्रीविष्‍णु वैकुंठातून कार्यक्रमस्‍थळी रथ ठेवलेल्‍या भागात येत आहे. या प्रक्रियेमुळे रथ झाकून ठेवलेल्‍या मंडपातून सूक्ष्मातून कमळ प्रक्षेपित होत आहे.’ हे दृश्‍य पहातांना मला जाणवले, ‘सूक्ष्मातून श्रीविष्‍णु आणि श्री महालक्ष्मी यांचे तत्त्व प्रगट होण्‍याची प्रक्रिया चालू आहे.’ मला हे दृश्‍य दिसल्‍यावर ५ ते १० सेकंदांनंतर रथ ठेवलेल्‍या मंडपावरील पडदा सरकवून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रथारूढ स्‍वरूपात समष्‍टीला दर्शन दिले.

३. महर्षींच्‍या आज्ञेने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी केलेल्‍या विशिष्‍ट वेशभूषेमुळे साधकांना वैराग्‍य, भक्‍ती अन् ज्ञान यांचा प्रसाद मिळणे

श्री. निषाद देशमुख

रथ ठेवलेल्‍या मंडपाचा पडदा सरकवून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी रथारूढ स्‍वरूपात समष्‍टीला दर्शन दिले. तेव्‍हा ‘तिन्‍ही समष्‍टी गुरूंकडून पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात प्रकाश समष्‍टीकडे प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले. तिन्‍ही गुरूंकडे पहातांना ‘ज्ञान, भक्‍ती आणि वैराग्‍य’ यांची स्‍पंदने जाणवत होती. या संदर्भात ईश्‍वराने मला सांगितले, ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ हे तिन्‍ही समष्‍टी गुरु असल्‍याने त्‍यांच्‍याकडून समष्‍टीसाठी आवश्‍यक असलेली शक्‍ती (ऊर्जा) सतत प्रक्षेपित होतच असते. ‘समष्‍टीला ही शक्‍ती सहजतेने ग्रहण करता यावी आणि सूक्ष्म स्‍तरावर तिन्‍ही गुरूंच्‍या चालू असलेल्‍या कार्याची प्रचीती यावी’, यासाठी महर्षि तिन्‍ही गुरूंना त्‍या शक्‍तीशी संबंधित विशिष्‍ट रंगाची वेशभूषा करायला सांगतात. काळानुसार सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्‍याकडून अनुक्रमे वैराग्‍य, भक्‍ती अन् ज्ञान यांची स्‍पंदने प्रक्षेपित होतात. त्‍यामुळे महर्षींनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वैराग्‍याशी निगडित भगवा, तर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना ज्ञानाशी संबंधित पिवळ्‍या रंगाचे वस्‍त्र परिधान करण्‍यास सांगितले. भक्‍तीचा रंग निळा, तर उत्‍पत्ती आणि समृद्धी यांचा रंग हिरवा असतो. साधकांमध्‍ये भाव असून त्‍याची वृद्धी होणे किंवा भावातून भक्‍तीची उत्‍पत्ती होणे आवश्‍यक असल्‍याने महर्षींनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना पोपटी रंगाचे वस्‍त्र परिधान करण्‍यास सांगितलेे. यांतून महर्षींच्‍या आज्ञेने तिन्‍ही समष्‍टी गुरु परिधान करत असलेल्‍या वेशभूषेचे आध्‍यात्मिक महत्त्व लक्षात येते.

४. ‘साधकांनी रथ ओढून प्रांगणात फिरवणे’  यामागील जाणवलेली सूत्रे

४ अ. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ पंचतत्त्वेच ओढत आहेत’, असे जाणवणे : कार्यक्रमस्‍थळी रथासाठी केलेल्‍या मंडपातून रथ प्रांगणात आणून नंतर पूर्ण प्रांगणात फिरवण्‍यासाठी २३ पुरुष साधकांचे नियोजन करण्‍यात आले होते. संख्‍याशास्‍त्रानुसार २३ म्‍हणजे २+३ = ५, म्‍हणजे ‘पंचतत्त्वेच श्री गुरूंचा (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) रथ ओढत आहेत’, असे मला जाणवले.

४ आ. ‘देवतेचा रथ ओढतांना समष्‍टी भाव आणि समष्‍टी क्रियमाण यांद्वारे देवतेच्‍या मूर्तीतील चैतन्‍याची जागृती करणे’, असा उद्देश असणे : साधक रथ मंडपातून ओढून प्रांगणात आणत असतांना मला सूक्ष्मातून ‘ॐ’ चा नाद ऐकू आला आणि आनंदाची स्‍पंदने जाणवली. मी ईश्‍वराला याचे कारण विचारल्‍यावर ईश्‍वराने मला सांगितले, ‘अनेक मंदिरांमध्‍ये देवतांना रथावर आरूढ करून रथ ओढला जातो. यामागे ‘समष्‍टी भाव आणि समष्‍टी क्रियमाण यांद्वारे देवतेच्‍या मूर्तीतील चैतन्‍याची जागृती करणे’, असा उद्देश असतो.

४ इ. ब्रह्मोत्‍सवात रथ ओढण्‍याच्‍या लीलेतून गुरुतत्त्व साधकांना समष्‍टी साधनेचा प्रचार आणि प्रयत्न वाढवण्‍याची शिकवण देत असणे : श्री गुरूंच्‍या प्रत्‍येक लीलेत समष्‍टीसाठी साधनेची एक शिकवण दडलेली असते.  समष्‍टी प्रारब्‍धात परिवर्तन करण्‍यासाठी समष्‍टी क्रियमाण आवश्‍यक असते. समष्‍टीच्‍या क्रियमाणानुसार समष्‍टीला साहाय्‍य करण्‍यासाठी, म्‍हणजे धर्मसंस्‍थापनेसाठी ईश्‍वर सूक्ष्म किंवा स्‍थूल, म्‍हणजे अवताररूपात प्रकट होतो. ब्रह्मोत्‍सवात रथ ओढण्‍याच्‍या लीलेतून गुरुतत्त्व साधकांना समष्‍टी साधनेचा प्रचार आणि प्रयत्न वाढवण्‍यास, म्‍हणजे समष्‍टी क्रियमाण वाढवण्‍याची शिकवण देत आहे.

४ ई. समष्‍टी क्रियमाणात वाढ झाल्‍यावरच अवतारी शक्‍ती प्रकट होऊन प्रत्‍यक्ष कार्य करणार असणे : रावण आणि कंस यांनी साधना अन् धर्मपालन करणार्‍या अनेक ऋषिमुनींना  त्रास दिला, तरी ऋषिमुनींनी साधना चालूच ठेवली. त्‍यामुळे रावण आणि कंस यांचा वध करून रामराज्‍य, म्‍हणजे धर्मराज्‍य स्‍थापित करण्‍यासाठी अनुक्रमे श्रीराम अन् श्रीकृष्‍ण हे अवतार झाले. याचप्रमाणे ईश्‍वरी राज्‍य, म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अवतार आहे; पण जोपर्यंत समष्‍टीच्‍या क्रियमाणात वाढ होणार नाही, तोपर्यंत अवतारी शक्‍ती प्रकट होऊन प्रत्‍यक्ष कार्य करणार नाही. समष्‍टीकडून ईश्‍वराला अपेक्षित एवढे क्रियमाण होत नसल्‍याने ईश्‍वराला हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची वेळ पुढे ढकलावी लागली आहे.

४ उ. साधकांनी संघटितपणे हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचे प्रयत्न करायचे असणे : रथावर आरूढ तिन्‍ही गुरु हिंदु राष्‍ट्राचे, म्‍हणजे रामराज्‍याचे प्रतीक आहेत. या तिन्‍ही गुरूंच्‍या हृदयात रामराज्‍य आहे. असे राज्‍य जगात स्‍थापित करायचे असल्‍याने ज्‍याप्रमाणे अनेक पुरुष साधकांनी मिळून रथ ओढून प्रांगणात आणला, त्‍याचप्रमाणे साधकांना संघटित होऊन हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे कार्य करावे लागणार आहे. हीच या लीलेत दडलेली गुरुतत्त्वाची शिकवण आहे. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेची प्रक्रिया आनंद देणारी असल्‍याने साधक रथ ओढत असतांना त्‍यांच्‍याकडे बघून आनंद जाणवला.

५. रथोत्‍सवातील एकूण क्रम

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ रथावर आरूढ झाल्‍यावर रथाच्‍या पुढे आणि मागे रथोत्‍सवातील सहभागी साधक उभे राहिले. सर्वांत पुढे धर्मध्‍वज घेतलेला साधक, त्‍यामागे कलश घेतलेल्‍या दोन सुवासिनी आणि चालणार्‍या साधकांचे पथक, त्‍यामागे ध्‍वजपथक (ध्‍वजनृत्‍य करणारे साधक), मग टाळपथक (टाळावर ठेका धरलेले साधक), त्‍यामागे रथ ओढणारे साधक अन् रथ, त्‍यांच्‍यामागे पुन्‍हा ध्‍वजपथक, टाळपथक आणि पुन्‍हा ध्‍वजपथक. अशा या रथोत्‍सवाची काही आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये माझ्‍या लक्षात आली.

५ अ. हा रथोत्‍सव म्‍हणजे श्रीविष्‍णूच्‍या चरणातून वहाणारी ‘मोक्षगंगा !’ : या रथोत्‍सवाच्‍या संदर्भात ईश्‍वराने सांगितले, ‘हा संपूर्ण रथोत्‍सव म्‍हणजे श्रीविष्‍णूच्‍या चरणातून वहाणारी ‘मोक्षगंगा !’ गंगेचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे तिची शुद्धता. ‘स्‍थुलातून गंगा नदीतील पाणी कितीही अस्‍वच्‍छ झाले, तरी गंगेतील पाण्‍यात विषाणू नष्‍ट करण्‍याची क्षमता अक्षुण्‍ण (जो नष्‍ट होत नाही, आहे तसाच रहातो) रहाते’, हे वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध झाले आहे, म्‍हणजेच गंगेची आध्‍यात्मिक क्षमता ‘सनातन’ (नित्‍य नूतन) आहे. ‘ॐ’ हेही सनातन तत्त्वाचे प्रतीक आहे. ‘रथोत्‍सवात गंगेसारखी शुद्धता आणि शाश्‍वतता आहे’, याचे प्रतीक, म्‍हणजे ‘धर्मध्‍वज (ॐ चिन्‍ह असलेला ध्‍वज)’ घेऊन रथोत्‍सवात सर्वांत पुढे चालणारा साधक.

५ अ १. मोक्षगंगेच्‍या गतीचे आणि नादाचे प्रतीक, म्‍हणजे रथोत्‍सवातील ध्‍वजपथक अन् टाळपथक : मोक्षगंगा गतीने वहाते. तिच्‍या गतीचे प्रतीक, म्‍हणजे रथोत्‍सवात एका लयीत नृत्‍य करत असलेले ध्‍वजपथक आणि मोक्षगंगा वहातांना एक सुमधुर नाद करते, या नादाचे प्रतीक म्‍हणजे रथोत्‍सवातील टाळपथक !

५ अ २. गंगेचे उलट आणि सुलट वहाणारे दोन्‍ही प्रवाह रथोत्‍सवात कार्यरत असणे : भारतात गंगा उत्तर ते दक्षिण वहाते. याचे प्रतीक, म्‍हणजे रथाच्‍या पुढे चालणारे साधक. गंगेतील पाण्‍याचा प्रवाह वाढल्‍यावर भारतातील वाराणसी शहराच्‍या काठावर असलेल्‍या मणिकर्णिका घाट ते तुलसी घाट येथे गंगा दक्षिणेकडून उत्तरेकडे वहाते. ‘गंगा उलटी वहाते’, याचे प्रतीक, म्‍हणजेच रथाच्‍या मागे चालणारे साधक. गंगेचा उगम भगवान विष्‍णुचे चरण आहे. यामुळे रथयात्रेत विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींच्‍या पुढे गंगास्‍वरूप साधकांची रांग होणे अपेक्षित आहे; पण गंगा उलटही वहाते. यामुळे रथाच्‍या मागेही गंगास्‍वरूप साधक उपस्‍थित होते. गंगेचे असे दोन्‍ही प्रकारचे प्रवाह ब्रह्मोत्‍सवातील रथोत्‍सवात कार्यरत होते.

(क्रमश: पुढच्‍या रविवारी)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१५.५.२०२३ आणि १६.५.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.