७७ दुकानदारांना प्रत्येकी ५० सहस्र, तर टपरीधारकांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे साहाय्य देणार !- पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्री सामंत यांच्याकडून चांदेराई (तालुका रत्नागिरी) येथील हानीग्रस्त परिस्थितीची पहाणी

रत्नागिरी, २९ जुलै (वार्ता.) – पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील चांदेराई गावाला भेट देत पुरामुळे हानीग्रस्त झालेल्या परिस्थितीची पहाणी केली. ७७ दुकानदारांना प्रत्येकी ५० सहस्र तर, टपरीधारकांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे साहाय्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘सुमारे ७७ दुकानांमध्ये पाणी शिरले होते. २ दिवस दुकानांत पाणी होते. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराला साहाय्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत, त्याचीही पहाणी करण्याच्या सूचना प्रांताधिकार्‍यांना दिल्या आहेत. ‘चांदेराई नदीमधील गाळ काढावा’, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करून हा सगळा गाळ काढण्यात येईल. पाणी शिरून हानी झालेल्या घरांविषयीही पंचनामे करून साहाय्य देण्यासंदर्भात अहवाल सिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.’’