‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनावर कारवाई करण्यात विलंब नाही ! – धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

मुंबई, २९ जुलै (वार्ता.) – ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या आस्थापनाच्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या उत्पादनाविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य ती चौकशी करून राज्यशासनाने या पावडरचे उत्पादन तात्काळ बंद केले आहे. याविषयी कुठलाही विलंब झालेला नाही, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी २८ जुलै या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. या संदर्भात आमदार सुनील शिंदे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री आत्राम पुढे म्हणाले की, ‘मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाकडे ‘आस्थापन औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४०’ अन् त्याखालील नियमाअंतर्गत सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनाचा परवाना होता. उच्च न्यायालयाने ११ जानेवारी २०२३ च्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने उत्पादनबंदीचा पारित केलेला आदेश रहित केला होता. त्यानंतर ‘मे. जॉन्सन ॲण्ड जॉन्सन प्रा. लि.’ने स्वतःहून जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन बंद केले.

दोषींकडून भरपाई घेण्याचे प्रावधान नाही !

याविषयी मंत्री आत्राम म्हणाले की, ‘औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४०’ या कायद्यांतर्गत नियम १९४५ मधील प्रावधानांचे उल्लंघन केल्यास त्याविषयी आस्थापनाकडून हानी भरपाई घेण्याची तरतूद नाही.