मंदिरांत रात्री ११ पर्यंत भजन आणि कीर्तन करण्यास अनुमती मिळावी ! – ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे

ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांची प्रतिक्रिया घेतांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर

मुंबई, २९ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रातील मंदिरांत रात्री १० नंतर भजन आणि कीर्तन करण्यास पोलीस प्रशासन अडवणूक करत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळ यांना रात्री ११ वाजेपर्यंत भजन अन् कीर्तन करण्यासाठी शासनाने अनुमती द्यावी, अशी मागणी आळंदी (जिल्हा पुणे) येथील स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष, शिवशाहीर आणि ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या मुंबई येथे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे म्हणाले की,

१. वारकरी संप्रदाय हा १८ पगड जातींना जोडणारा संप्रदाय आहे. नवी मुंबई आणि मुंबई यांसह इतर शहरात अखंड नाम सप्ताह घ्यायचा म्हटले, तर २५-२६ ठिकाणी अनुमती काढावी लागते. अनुमती मिळाली, तरी आम्हाला ९ किंवा ९.३० वाजेपर्यंतच भजन आणि कीर्तन करण्यास अनुमती मिळते. तसे न केल्यास पोलीस मंदिरात अथवा सोहळ्याच्या ठिकाणी येऊन ध्वनीक्षेपक बंद करतात.

२. वारकरी संप्रदायाचा विचार केल्यास अशा कृत्यामुळे आपण विकृतीकडे चाललेलो आहोत. मुख्यमंत्री आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी यांना विनंती आहे की, महाराष्ट्रातील मंदिरात रात्री ११ वाजेपर्यंत भजन आणि कीर्तन करण्यास वेळ वाढवून मिळावी.

३. ‘स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांना रात्री ११ वाजेपर्यंत मंदिरात कीर्तन करण्यास अनुमती मिळण्यासाठी तुम्ही निवेदन दिले होते का ?’ या प्रश्नावर ह.भ.प. आकाश महाराज भुंडवे महाराज म्हणाले की, स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले होते; मात्र अजूनही अनुमती मिळालेली नाही. सामाजिक माध्यमांवर आम्ही आवाहन केले की, आम्हाला भजन आणि कीर्तन करण्यास वेळ अपुरा पडत असल्याने तो वाढवून मिळावा. समाजातील लोक दैनंदिन जीवनात आपल्या अडचणींना सामोरे जाऊन परमार्थ करतात. अनेक जण कामावर जात असल्याने, तसेच घरातील कामांमुळे त्यांना सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भजन आणि कीर्तन ऐकायला वेळ मिळत नाही. रात्री ९ नंतर लोकांना वेळ मिळतो. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला बाधा निर्माण न करता रात्रीची वेळ वाढवून दिल्यावर सर्वांना मनोभावे सहभागी होता येईल. घराघरात हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यांसह इतर शहरांत होणारे अखंड नाम सप्ताह वेळेअभावी मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे अशा शहरांत योग्य नियोजन होऊन वारकरी आणि धारकरी, तसेच भक्ती अन् शक्ती यांचा संगम व्हावा. कीर्तन आणि प्रवचन यांच्या माध्यमांतून आम्ही ज्ञानरूपी चारा भाविक अन् भक्त यांच्या मुखी देण्याचा प्रयत्न करत आहोत. असा वारकरी संप्रदाय घराघरात पोचावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

– ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे