मुंबई येथील नूर धर्मादाय रुग्णालयातील चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला ! – सौ. यामिनी जाधव, आमदार, शिवसेना
सनातन प्रभात विशेष वृत्त…
मुंबई, २३ जुलै (वार्ता.) – येथील नूर धर्मादाय रुग्णालयातील गर्भवती महिला प्रज्ञा रोहन केदारे लोखंडे (वय २९ वर्षे) हिच्यावर वेळेवर उपचार आणि आधुनिक वैद्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केला. नूर धर्मादाय रुग्णालयाविषयी यापूर्वी माझ्याकडे तक्रारी आलेल्या होत्या. एखादी जरी तक्रार मिळाली, तर त्यामध्ये काहीतरी करावे; जेणेकरून त्यांच्या नातेवाइकांना न्याय मिळेल. रुग्णांकडे दुर्लक्ष करणार्या खासगी, धर्मादाय किंवा कोणत्याही रुग्णालयांवर लोकप्रतिनिधींचा वचक असला पाहिजे, तरच लोकप्रतिनिधी याविषयी आवाज उठवतात, असा पायंडा पडेल. चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी ही लक्षवेधी मांडून आवाज उठवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार सौ. यामिनी जाधव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.
रुग्णालयातील अपप्रकारांविषयी तक्रारी करूनही प्रशासन त्याची नोंद घेत नाही ? याविषयी तुमचे काय मत आहे ?
सौ. यामिनी जाधव म्हणाल्या की, समाजातून लोकप्रतिनिधींकडे तोंडी तक्रारी केल्या जातात; मात्र बर्याच वेळा लेखी स्वरूपात लोक तक्रारी करत नाहीत. ज्या वेळी आमच्याकडे तक्रारी येतात, त्या वेळी आमचे कर्तव्य आहे, त्या विरोधात आम्ही आवाज उठवून न्याय मिळवून दिला पाहिजे. अशाच प्रकारे मी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देते की, त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे या घटनेकडे पाहिले आहे. मी आशावादी आहे की, त्याच काय इतर महिलांवर असा अन्याय होणार नाही, असे मी पाहीन. एका व्यक्तीला न्याय मिळाला, तर तो त्यांच्यापर्र्यंत तो पोचला जाईल.
रुग्णालयातच डायलिसिसची सुविधा देण्याविषयी मी आरोग्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवणार !
पालकमंत्री तथा शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी नायर रुग्णालयाला भेट दिली होती. त्या दृष्टीने गरीब रुग्णांना साहाय्य करण्याविषयी आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे. नायर या मोठ्या रुग्णालयात मुख्य प्रयोगशाळा आहे. शासनाने त्यांना निधी दिला, तर ते अद्यावत् प्रयोगशाळा बनवू शकतील. याविषयी शासनाने सकारात्मक उत्तर दिलेले आहे. गरीब रुग्णांना बाहेर जाऊन ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या दृष्टीने नायर रुग्णालयात तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नायर रुग्णालयात अनेक विभाग आहेत, तेथे मोठी प्रयोगशाळा झाली, तर गरीब रुग्णांना बाहेर जाऊन विविध चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही. आपण अनेक लोकांना वैद्यकीय सेवा देतो, तर त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देतो, त्यामानाने तशा सुविधा देणे आवश्यक आहे. लालबागचा राजा, सिद्धिविनायक ट्रस्ट रुग्णांना साहाय्य करते. हे दोन्ही सोडले, तर बाहेर खासगी रुग्णालयात डायलिसिसच्या रुग्णांना ३ ते ४ सहस्र रुपये व्यय येतो. हे परवडणारे नाही. त्याअनुषंगाने नायर हे मोठे रुग्णालय असून तेथे अनेक इमारती आहेत, तेथे डायलिसिसचे केंद्र उभे करून दिले, तर महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकतो. डायलिसिसच्या रुग्णांकडे उपचारासाठी पैसे नसतील, तर ते प्रवासाचे पैसे कसे देऊ शकतील ? जे.जे. रुग्णालयात किमान खाटा आणि मशीन्स दिल्या पाहिजेत. डायलिसिसचे मशीन पुष्कळ महाग आहे, असेही नाही. चांगला निधी उपलब्ध करून दिला, तर राज्यातील अनेक रुग्णालयांत डायलिसिसची सुविधा देऊ शकतो. याविषयी मी आरोग्यमंत्र्यांकडे नक्कीच प्रस्ताव पाठवणार आहे.