हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !
‘राहुल गांधी म्हणतात, ‘‘मी हिंदु आहे; पण हिंदुत्वनिष्ठ नाही.’’ हिंदु म्हणजे कोण ?हिंदुत्व म्हणजे काय ?, हिंदुत्वनिष्ठ कुणाला म्हणायचे ?, याचा थोडा फार तरी अभ्यास त्यांनी केला असता, तर त्यांनी असे विधान केले नसते. मुळात ज्या वाईट अर्थाने त्यांनी ‘हिंदुत्वनिष्ठ’ हा शब्द वापरला आहे, तो ‘हिंदुत्वनिष्ठ’ या शब्दाचा अर्थ नाही. जगातील सर्वांत प्राचीन, वैज्ञानिक, मानवतावादी, समतावादी, भूतदयावादी, पर्यावरणवादी, तसेच व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांचा एकाच वेळी समग्रपणे विचार करणार्या सनातन धर्माचे आचार, विचार अन् संस्कार म्हणजे हिंदुत्व ! ‘हिंदु’ हा शब्द शरीर असेल, तर ‘हिंदुत्व’ हा त्या शरिराचा प्राण होय. प्राणाविना शरीर जसे अचेतन असते, तसे हिंदुत्वाविना हिंदु म्हणजे केवळ अपघाताने झालेला हिंदु असतो; ज्याला स्वतःला हिंदु म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार नसतो. असा हिंदु जिवंत असूनही निष्प्राण आणि चैतन्यहीन असतो. या लेखात हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता समजून घेऊ.
१. व्यापक आणि सर्वसमावेशक हिंदुत्व !
अ. ‘एकं सद़् विप्रा बहुधा वदन्ति ।’
(ऋग्वेद, मण्डल १, सूक्त १६४, ऋचा ४६)
अर्थ : ‘सत्य (परमेश्वर) एकच आहे; पण ज्ञानीजन त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात’, असा उदार दृष्टीकोन असणे म्हणजे हिंदुत्व !
हिंदुत्व पुष्कळ व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. हिंदुत्व म्हणजे मूर्तीमंत सहिष्णुता. ‘मी म्हणतो तेच केवळ खरे आणि इतर जण म्हणतात ते सारे खोटे’, ‘माझाच धर्मग्रंथ खरा इतरांचे धर्मग्रंथ खोटे’, असा संकुचितपणा हिंदुत्वाला मान्य नाही.
२. ‘सर्व एकाच परमेश्वराकडे पोचते’, असे मानणारे हिंदुत्व !
अ. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
अर्थ : जसे आकाशातून पडलेले पाणी (ओढे, नद्या, नाले या माध्यमातून) शेवटी समुद्राला मिळते, तसा सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी एकाच विष्णूला (ईश्वराला) मिळतो.
अशा सर्वसमावेशक आणि शाश्वत सत्याचा अंगीकार करणे म्हणजे हिंदुत्व ! सत्य आणि सन्मार्ग यांवरून चालणारा साधक मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, शेवटी तो त्या एकाच सत्याप्रत पोचतो, असा ठाम विश्वास ठेवणे म्हणजे हिंदुत्व !
आ. शिवमहिम्नस्तोत्रात म्हटले आहे की,
रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ॥
– शिवमहिम्नस्तोत्र, श्लोक ७
अर्थ : आकाशातून वेगवेगळ्या ठिकाणी पडणारे पाणी ज्याप्रमाणे शेवटी समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे लोकांकडून निरनिराळ्या मनोभावांनी अनुसरले जाणारे पूजनाचे मार्ग सरळ असोत अथवा वक्र, शेवटी एकाच परमात्म्याला जाऊन मिळतात.
एवढा उदार दृष्टीकोन असणे म्हणजे हिंदुत्व.
३. सर्वत्र ईश्वराचेच अस्तित्व मानत असल्याने भेद न मानणारे हिंदुत्व !
अ. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।
कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ॥
अर्थ : हे संपूर्ण जगच विष्णुमय आहे. (म्हणजेच सर्व अणू-रेणूत एकच ईश्वर तत्त्व विद्यमान आहे.) हाच विष्णुभक्तांचा धर्म आहे. यामुळे भेदभाव करणे, हा भ्रम असून ते कर्म अपवित्र आहे. आपल्याकडून कोणत्याही जिवाचा मत्सर घडू नये, हे परमेश्वराच्या पूजनाचे खरे मर्म आहे.
आ. उपनिषदकार म्हणतात, ‘ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।’ (ईशावास्योपनिषद़्, मंत्र १)
अर्थ : ‘या जगातील प्रत्येक अणू-रेणूमध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे.’
ब्रह्मांडात जे काही चराचर दिसते, ते सर्व ईशतत्त्वाने व्यापलेले आहे; म्हणून मग द्वेष किंवा हिंसा कुणाची आणि का म्हणून करायची ? हे वास्तव समजून घेत त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे हिंदुत्व !
४. सर्वांना जगण्याचा अधिकार देणारे हिंदुत्व !
अ. संत तुलसीदास एके ठिकाणी म्हणतात, ‘‘तुलसी मेरे राम को, रीझ भजो या खीज । भौम पडे जामे सभी, उलटा सीधा बीज ॥’’ अर्थ : भूमीवर पडलेले बीज उलटे पडो कि सरळ त्यातून रोपाची उगवण होतेच. त्याप्रमाणे श्रीरामाचे नाव तुम्ही भक्तीभावाने, प्रेमाने घ्या कि रागाने किंवा नाईलाजाने घ्या, शेवटी रामाला पावतेच आणि फलही पदरात टाकते.
आयुष्यभर केलेल्या पापाचरणामुळे वाल्मीकिंना आपल्या मुखातून रामनाम उच्चारता येत नव्हते; म्हणून देवर्षी नारदांनी त्यांना रामाचा ‘मरा मरा’ असा उलटा जप करण्याचा सल्ला दिला. अनेक वर्षे अखंडपणे त्यांनी रामनामाचा केलेला उलटा जप ‘रामराम’ असा सरळपणे परावर्तित होऊन वाल्मीकि रामरूप झाले. असा वाल्याचा वाल्मीकि करण्याचे सामर्थ्य असणार्या राम आणि रामनामावर प्रगाढ विश्वास ठेवणे म्हणजे हिंदुत्व.
आ. ‘केवळ आम्हीच जगू इतर धर्मियांनी एक तर आमचा धर्म स्वीकारावा, आमचाच धर्मग्रंथ मानावा अन्यथा मृत्यूस सामोरे जावे’, हा धर्मांधपणा आणि दुराग्रह हिंदुत्वाला मान्य नाही. ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वाशी प्रामाणिक राहून त्याप्रमाणे जीवनात आचरण करणे म्हणजे हिंदुत्व !
इ. विश्वातील सर्व लहानमोठ्या जिवांना जगण्याचा अधिकार आहे, असे मानून ‘अहिंसा परमो धर्मः ।’ म्हणजे ‘अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे’, यावर विश्वास ठेवणे म्हणजे हिंदुत्व !
५. संपूर्ण विश्वाला कुटुंब मानणारे व्यापक हिंदुत्व !
अ. संपूर्ण जगालाच कुटुंब मानतांना आमच्या पूर्वजांनी म्हटले आहे की,
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥
– हितोपदेश, संग्रह १, श्लोक ७१
अर्थ : ‘हा माझा, तो परका’ असा विचार कोत्या मनाचे लोक करतात. उदार मनाचे लोक मात्र संपूर्ण जगालाच आपले कुटुंब मानतात.
असे सर्व जगाला आपलेच कुटुंब समजून सर्वांशी समान प्रेमाने रहाणे म्हणजे हिंदुत्व !
आ. मग सर्व जगालाच स्वतःचे कुटुंब समजणारा केवळ आपल्या एकट्याच्याच भल्यासाठी ईश्वराला प्रार्थना कशी करणार ? म्हणून आमचे पूर्वज असणार्या ऋषिमुनींनी शांतीमंत्राची प्रार्थना करतांना म्हटले आहे,
सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद़् दुःखमाप्नुयात् ॥
अर्थ : सर्व प्राणीमात्र (जग) सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो (निरोगी राहो). सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.
अशी जगातील सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करण्याची उदात्तता म्हणजे हिंदुत्व !
६. पृथ्वीसह सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्यास शिकवणारे हिंदुत्व !
अ. आपण ज्या भूमीत जन्म घेतो त्या मातृभूमीविषयी प्रेम, अभिमान वाटणे साहजिक आहे; पण हिंदुत्व त्याही पुढे जाऊन ‘माता भूमिः पुत्रो अहं पृथिव्याः ।’ (अथर्ववेद, काण्ड १२, सूक्त १, खण्ड १२) म्हणजे ‘पृथ्वी माझी माता आहे, मी तिचा पुत्र आहे’, असे मानते. एकदा या भूमीचा पुत्र मानले की, मग ओघानेच तिचे आणि तिच्या वरच्या सर्व जिवांचे रक्षण करणे, तिचे शोषण न करणे या पुत्रकर्तव्यांचे पालन करणे आलेच.
आ. हिंदुत्व केवळ प्राणीमात्रातच नव्हे, तर वृक्ष, दगड, निर्जीव वस्तूतही देवत्व पहायला शिकवते; म्हणून कोणत्याही निर्जीव वस्तूलाही हिंदूंकडून पायाने ठोकरले जात नाही. उलट कोणत्याही वस्तूला चुकून पाय लागला, तरी त्या वस्तूला नमस्कार केला जातो. वृक्ष असो, प्राणी असो, जो कुणी आपल्यावर उपकार करतो, उपयोगी पडतो त्याच्याविषयी पूज्य आणि कृतज्ञ भाव ठेवणे म्हणजे हिंदुत्व !
इ. म्हणूनच जगद़्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।’ म्हणजे ‘झाडे, वेली, वनचर (पशू-पक्षी) आमचे सोबती आहेत.’ म्हणूनच हिंदुत्वाला गायीमध्ये, नदीमध्ये, आपले पालन-पोषण करणार्या भूमीमध्ये आणि मातृभूमीमध्ये मातृत्वाचा साक्षात्कार होतो.
७. एकात्मभाव जपून सर्वांना सारखे मानणारे हिंदुत्व !
अ. ‘आत्मवत् सर्वभूतेषु ।’ म्हणजे ‘आपल्यासारखे सर्वांना मानणे’ म्हणजे हिंदुत्व !
आ. ‘परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ।’ म्हणजे ‘परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप होय.’ दुसर्याला पीडा देणे हे पाप, तर दुसर्याच्या उपयोगी पडणे म्हणजे हिंदुत्व !
इ. ऋग्वेदात एक प्रार्थना केली आहे –
समानी व आकूतिः समाना हृदयानि वः ।
समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति ॥
– ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १९१, ऋचा ४
अर्थ : (हे मानवांनो,) तुमचे संकल्प एकसमान असोत. तुमची हृदये एक(भाव) होवोत. तुमची मने एकसमान होवोत. तुमचे पूर्णरूपाने संघटन होवो. (असे झाले, तरच आपल्या सर्वांचे जीवनव्यवहार सुसंगत आणि शोभनीय होतील.)
८. सर्व प्राणीमात्रांत एकात्म भाव जपणारे हिंदुत्व !
अ. दुसर्या एका प्रार्थनेत म्हटले आहे,
ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्विषावहै ॥
अर्थ : परमात्मा आम्हा गुरु-शिष्यांचे एकत्र रक्षण करो, आम्हाला जीवनाचा एकत्रितपणे आनंद घेता येवो, आम्हाला एकत्र पराक्रम गाजवता येवो, आम्हा दोघांचे अध्ययन
तेजस्वी होवो, आम्हा दोघांमध्ये एकमेकांप्रति द्वेषभावना उत्पन्न होऊ नये.
आ. आमची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली तर विश्वाच्या कल्याणासाठी ईश्वराजवळ पसायदान मागतांना म्हणते,
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९४
अर्थ : दुष्टांचा दुष्टपणा, (वाकडेपणा) कुटीलपणा नाहीसा होवो, त्यांच्यामध्ये सत्कर्माची आवड उत्पन्न होवो आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये परस्परांशी मैत्रीचा व्यवहार असो.
९. ‘सर्वांना सर्व मिळू दे’, अशी भावना असणारे हिंदुत्व !
अ. एके ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ‘जो जें वांछील तो तें लाहो ।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९५) म्हणजे ‘जो जे इच्छील, ते त्याला प्राप्त व्हावे’, असे विश्वाच्या कल्याणासाठी देवाजवळ पसायादान मागणे म्हणजे हिंदुत्व !
खरे तर ज्ञानदेवांचे पसायदान ही ‘विश्वाची प्रार्थना’ म्हणून संयुक्त राष्ट्राने तिला मान्यता द्यावी, एवढी त्याची थोरवी आहे.
आ. समाज आपल्याला पुष्कळ काही देतो; पण आपण समाजाला काय देतो ? याचा विचार कधी कुणी करतो का ? पण हिंदुत्वाने याचा विचार करत एका प्रार्थनेत म्हटले आहे –
जीवने यावदादानं स्यात् प्रदानं यत् ततोऽधिकम् ।
इत्येषा प्रार्थनाऽस्माकं भगवन् परिपूर्यताम् ।
अर्थ : ‘हे भगवंता, जीवनात जेवढे (धन) प्राप्त होईल, त्याच्या अनेक पटींनी दान करण्याची क्षमता माझ्या अंगी येऊ दे’, ही आमची प्रार्थना आपण पूर्ण करावी.
अशी प्रार्थना करणे म्हणजे हिंदुत्व ! हिंदुत्वाला कुणाच्याही उदात्त विचाराचे वावडे नाही. मग हा विचार जगातून कुठल्याही भागातून आलेला असो, त्याविषयी आक्षेप नाही.
१०. केवळ मंगल आणि कल्याणकारी वचने ऐकण्यास शिकवणारे हिंदुत्व !
अ. ऋग्वेदात आमच्या ऋषींनी म्हटले आहे, ‘आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः ।’ (ऋग्वेद, मण्डल १, सूक्त ८९, ऋचा १) ‘जगातील सर्व मंगल विचार सर्व दिशांनी आमच्याकडे येवोत.’
आ. दुसर्या एका प्रार्थनेत मागणी केली आहे, ‘ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा ।’ (हे देवहो, कानांनी आम्ही कल्याणकारी वचने ऐकावीत), अशी पवित्र आणि उन्नत प्रार्थना करणे म्हणजे
हिंदुत्व !’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.