‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडपणारा ‘वक्फ’ कायदा रहित करा !
हिंदु जनजागृती समितीची केंद्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !
वणी (यवतमाळ), २९ जुलै (वार्ता.) – वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाज संतप्त आहे. वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाकडे उपविभागीय अधिकारी, वणी कार्यालयाच्या माध्यमातून पाठवण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तहसीलदार निखिल धुळधर यांनी निवेदन स्वीकारले. ‘वक्फ बोर्डा’ची संपूर्ण चौकशी करून अवैधरित्या लाटलेली सर्व भूमी संबंधितांना परत केली पाहिजे, तसेच दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतांना राष्ट्रहित संवर्धन समितीचे श्री. संदीप मदान, श्रीराम महाआरती भक्त मंडळाचे सर्वश्री नरेश निकम, संतोष लक्षट्टीवार, पंकज कुळमेथे, साहील देवाळकर, विक्की बोलचप्पावार, पवन उरकुंडे आणि समितीचे लहू खामणकर, तसेच लोभेश्वर टोंगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.