जलमय परिस्थितीमुळे कल्याण येथील १ सहस्र कुटुंबांचे स्थलांतर !
ठाणे, २९ जुलै (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण शहरातील वालधुनी काठ परिसरातील १ सहस्र कुटुंबांचे २७ जुलैच्या रात्री संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाचे जवान यांनी हे स्थलांतर केले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री स्थलांतरित नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने त्यांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
अनेक वर्षे मागणी करूनही वालधुनी नदीपात्रातील गाळ काढला जात नाही ! – आमदार गणपत गायकवाड, भाजप
वालधुनी नदी गाळाने भरली आहे. नदीमधील गाळ बाहेर काढणे आवश्यक आहे. अनेक वर्षे मागणी करूनही गाळ काढला जात नाही. नाले, गटार स्वच्छतेची कामे पालिकेकडून योग्य रितीने होत नाहीत. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होत आहे.