मंडणगड तालुक्यातील भोळवली येथील धरणाच्या भिंतीला गळती : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मंडणगड – तालुक्यातील भोळवली येथील धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने दापोलीच्या पाटबंधारे विभागाने २६ जुलैला ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर धरणात साठलेल्या पाण्याचा विसर्ग चालू केला आहे; मात्र ग्रामस्थांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार तानाजी शेजाळ, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गोसावी यांनी २७ जुलैला ग्रामस्थांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. नदीकिनारी असलेल्या गावातील ग्रामस्थ आणि धोकादायक घरांमुळे खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत, तसेच पाटबंधारे विभागाला योग्य ती कारवाई करण्याची सूचनाही महसूल विभागाने दिलेली आहे.
देवाचा डोंगर येथून उगम पावणार्‍या भारजा नदीचे पाणी अडवून बांधण्यात आलेल्या या माती धरणाचा आकार लघु स्वरूपाचा असून धरणाची पाणी साठवण्याची ६.९१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या नदीच्या प्रवाह मार्गावर कादवण, लाटवण, पिंपळोली तिडे, तळेघर, चिंचघर यांसारखी १२ गावे येतात. या गावांतील नदीकिनारी असलेल्या गावांना धरणातून पाणी सोडल्याने प्रवाहाची पाणीपातळी वाढल्याने धोका निर्माण होऊ शकतो.

धरणाला गळती लागल्याचे स्थानिक महसूल प्रशासनासही माहिती देण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग दापोली धरणावर लक्ष ठेवून आहेत. धरण सुरक्षित आहे अथवा नाही आणि गावास किती धोका आहे ? याविषयी यंत्रणेने योग्य तो खुलासा वेळेवर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. (अशी मागणी जनतेला का करावी लागते ? खरे तर प्रशासकीय यंत्रणेनेच स्वत:चे दायित्व लक्षात घेऊन याचा खुलासा करणे अपेक्षित आहे ! – संपादक) 

भोळवली धरणाला कोणताही धोका संभवत नाही ! – कार्यकारी अभियंता गणेश सलगर  

मंडणगड लघु पाटबंधारे योजना भोळवली धरणाच्या प्रथमदर्शनी गळतीचे प्रमाण पहाता धरणाला कोणताही धोका संभवत नाही. धरणाची पाणीपातळी अल्प झाल्यानंतर गळतीचे ठिकाण निश्चित करून यावर उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी दिली.

याविषयीच्या पत्रकात म्हटले आहे की,

या धरणातून सद्यःस्थितीत ६.९८२ क्युमेक्स इतका विसर्ग चालू आहे. धरणातील गळतीची पातळी निश्चित करण्यासाठी विमोचकातून २.२० क्युमेक्स विसर्ग चालू करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या समवेत विठ्ठलमंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी धरणावरती पूर्ण वेळ कर्मचारी ठेवण्याची मागणी करण्यात आली. धरणावरती हंगामी दोन पाळीमध्ये कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तथापि ग्रामस्थांच्या मागणीनुसार पावसाळा कालावधीकरता अन्य २ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामामुळे धरणातील गळतीचे प्रमाण मागील हंगामापेक्षा अल्प झाल्याचेही काही ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. प्रथमदर्शनी गळतीचे प्रमाण पहाता धरणास कोणताही धोका संभवत नाही.