सीरियातील सर्वांत प्रसिद्ध शिया धार्मिक स्‍थळाजवळ झालेल्‍या बाँबस्‍फोटात ६ जण ठार !

बॉम्बस्फोट झालेले ठिकाण

दमास्‍कस (सीरिया) – सीरियातील सर्वांत प्रसिद्ध धार्मिक स्‍थळाजवळ २७ जुलैच्‍या रात्री झालेल्‍या बाँबस्‍फोटात ६ जण ठार झाले, तर २३ जण घायाळ झाले. हा बाँब मोटारसायकलमध्‍ये ठेवण्‍यात आला होता. ‘सीरियन अरब न्‍यूज एजन्‍सी’च्‍या मते, स्‍फोट इतका जोरदार होता की, जवळच्‍या टॅक्‍सीचे तुकडे झाले. राजधानी दमास्‍कसच्‍या ग्रामीण भागात ‘असयदा जैनब’ या महंमद पैगंबर यांच्‍या नातीचे थडगे असून शिया मुसलमानांमध्‍ये हे सर्वांत प्रसिद्ध धार्मिक स्‍थळ आहे. याला लक्ष्य करून हा स्‍फोट करण्‍यात आला. या स्‍फोटामागे कुणाचा आहे, हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही.

अधिकृत माध्‍यमांनी एका सुरक्षा अधिकार्‍याच्‍या हवाल्‍याने सांगितले की, त्‍याच भागात २६ जुलै या दिवशी झालेल्‍या एका स्‍फोटात २ नागरिक घायाळ झाले होते. केवळ सीरियातच नव्‍हे, तर शेजारच्‍या इराकमध्‍येही इस्‍लामिक स्‍टेटचे सुन्‍नी मुसलमान आतंकवादी शिया मशिदींना वारंवार लक्ष्य करत आहेत.