कोल्हापूरमधील दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या कामात कोट्यवधीचा घोटाळा करणारे अधिकारी निवृत्त !
मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – कोल्हापूरमधील आतंरराज्य प्रकल्प असलेल्या दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याविषयीची लक्षवेधी सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत उपस्थित केली.
याविषयी उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्यातील अधिकारी निवृत्त झाले आहेत; मात्र एक अधिकारी अद्यापही कार्यरत आहेत. त्यांची चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
या कामामध्ये ३ कोटी ४८ लाख रुपयांचा अपहार आढळून आला आहे. निवृत्तीनंतर ४ वर्षांत अहवाल आला, तरच त्यांना दोषी धरता येते; मात्र वर्ष २०००-२०१३ या कालावधीत हा प्रकार घडला. यातील सर्व अधिकारी निवृत्त झाले आहेत. या कामाची तांत्रिक मान्यता घेऊन कामाचे पैसे द्यावयाचे होते; मात्र २१ जानेवारी २०२२ या दिवशी या कामाच्या ४० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. याविषयी चौकशी केली जाईल. या प्रकरणी दूधगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित केले जाईल, तसेच जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे एका मासाच्या आत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.