महाराष्ट्र : विधानभवनातील गैरसोय, अस्वच्छता आणि प्रवेश ओळखपत्र या संदर्भात सदस्यांकडून अप्रसन्नता !

 विधान परिषद कामकाज

डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मुंबई – विधानपरिषदेतील आमदारांना प्रवेश ओळखपत्र मिळत नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र मिळत नाहीत, उपाहारगृहात बसण्यासाठी जागा मिळत नाही, स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत, तिथे पाण्याचे नळ वहात असतात, अशा अनेक त्रुटी सदस्यांनी औचित्याच्या सूत्राद्वारे विधान परिषदेत मांडल्या. यावर उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, ‘‘पूर्वी आता अन्य कुणालाही प्रवेश ओळखपत्र द्यायचे नाही, असे ठरल्याने ते देणे बंद केले आहे. तरीही आमदारांना २ ओळखपत्र देऊ. ओळखपत्राच्या संदर्भात अपप्रकार होत असतील, तर त्यांची नावे द्यावीत.’’

भाजपचे सदस्य श्री. प्रवीण दरेकर

या संदर्भात भाजपचे सदस्य श्री. प्रवीण दरेकर यांनी, ‘‘आम्हाला आणि कार्यकर्त्यांना विधान परिषदेत आत येण्यासाठी ओळखपत्र मिळत नाही; मात्र ‘काही जणांना १ सहस्र आणि ५ सहस्र रुपयांना ते मिळते’, अशी वृत्त आली आहेत’’, असा आरोप केला. उद्धव ठाकरे गटाचे आमदार श्री. अनिल परब यांनी स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ असतात, तसेच उपहारागृहात बाहेरचेच लोक येऊन बसतात, त्यामुळे आम्हाला अल्पाहार करण्यासाठीही जागा मिळत नाही, अशा गोष्टींकडे सदनाचे लक्ष वेधले. काही सदस्यांनी बाहेरचे लोक आमदारांना मार्गिकेत धक्काबुक्की करतात, असेही निदर्शनास आणून दिले.