गोवा : दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक २९ जुलैनंतर पूर्ववत् होणार

करंझोळ येथे रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने उद्यापर्यंत काही रेल्वेगाड्या रहित

दरड कोसळल्यामुळे माती हटवण्याचे काम चालू आहे

मडगाव, २७ जुलै (वार्ता.) – दूधसागर ते कॅसलरॉक यामधील करंझोळ रेल्वेस्थानकाच्या ब्रागांझा घाटात  दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा कोलमडली आहे. काही रेल्वेगाड्या २९ जुलैपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत, तर निझामुद्दीन एक्सप्रेस आणि जसिदीह एक्सप्रेस या रेल्वेगाड्या अनुक्रमे बेळगाव आणि लोंढा या रेल्वेस्थानकांवरून चालू ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्यांची वास्को-द-गामा ते बेळगाव किंवा लोंढा ही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वास्को-द-गामा ते कचेगुडा (कर्नाटक) या मार्गावरील शालीमार एक्सप्रेस ही रेल्वेगाडी हुब्बळ्ळीपासून कचेगुडापर्यंत चालू ठेवण्यात आली आहे.

रेल्वे क्रमांक १७३०९ ही यशवंतपूर ते वास्को-द-गामा आणि रेल्वे क्रमांक १७३१० ही वास्को-द-गामा ते यशवंतपूर या रेल्वेगाड्या २९ जुलैपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे  रेल्वे क्रमांक १७४१९/१७०२१ तिरुपती/भाग्यनगर ते वास्को-द-गामा एक्सप्रेस ही २७ जुलैची गाडी रहित करण्यात आली होती आणि रेल्वे क्रमांक १७४२०/१७०२२ वास्को-द-गामा ते तिरुपती/भाग्यनगर एक्सप्रेस ही २८ जुलैला धावणारी गाडी रहित करण्यात आली आहे.

रेल्वे क्रमांक १२७८० ही हजरत निजामुद्दीन ते वास्को-द-गामा एक्सप्रेस ही गाडी २६ आणि २७ जुलै या दिवशी बेळगावपर्यंत आली. तेथून वास्को-द-गामापर्यंतचा प्रवास रहित करण्यात आला. त्याचप्रमाणे रेल्वे क्रमांक १२७७९ ही वास्को-द-गामा ते हजरत निजामुद्दीन ही एक्स्प्रेस गाडी २९ जुलैपर्यंत बेळगावहून हजरत निजामुद्दीनला जाईल.

रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटवून रेल्वेमार्ग आणि सेवा पूर्ववत् चालू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले, तरी अर्धाअधिक बोगदा बंद होईल एवढे दरड कोसळण्याचे प्रमाण असल्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस थांबावे लागणार, असा अंदाज दक्षिण-पश्चिम रेल्वे अधिकार्‍यांनी वर्तवला आहे.