‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजनाद्वारे अतीदुर्गम भागातील रुग्णांना सेवा दिली जात आहे ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
विधान परिषद कामकाज…
मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – अतीदुर्गम भागांमध्ये रुग्णांना ‘टेलिमेडिसन’च्या माध्यमातून सेवा दिली जात होती. त्यानंतर केंद्र सरकारने आयुष्यमान योजनेअंतर्गत ‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजना आणली. त्यानुसार अतीदुर्गम किंवा दूरच्या भागांमध्ये रुग्णांना सेवा दिली जात आहे. या संदर्भात मे. मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रा.लि. या आस्थापनासमवेत येत्या १५ दिवसांमध्ये चर्चा करून त्यांचे साहाय्य घेण्याविषयी सकारात्मक चर्चा करू, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २७ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. मे. मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रा.लि. यांच्यासमवेतचा करार वर्ष २०१९ मध्ये संपुष्टात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या सेवेसाठी ५ तज्ञ आधुनिक वैद्य आणि ३ विशेषज्ञ आधुनिक वैद्य यांच्याद्वारे रुग्णांना सेवा दिली जात आहे.
ई संजिवनीमधून महाराष्ट्रात १० सहस्र ५८५ उपकेंद्रांमध्ये ५४ लाख ७५ सहस्र रुग्णांना वैद्यकीय लाभ मिळाला असून ही सेवा पूर्ण विनामूल्य आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सेवेतील केवळ २० मिनिटांमध्ये आधुनिक वैद्य आणि रुग्णवाहिका पोचण्यासाठी सरकार नवीन योजना आणत आहे, असेही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. |
परभणी जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन शल्यचिकित्सक निलंबित !
परभणी जिल्हा रुग्णालयातील तत्कालिन शल्यचिकित्सकांनी वित्तीय अनियमितता केल्याचे सिद्ध झाले आहे. चौकशी समितीला त्यांनी साहाय्य केले नाही. त्यामुळे तत्कालीन शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांना निलंबित केले आहे, असेही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या वेळी घोषित केले.