महाराष्ट्रात उद्योजकांची गुंतवणूक सुलभ आणि कालमर्यादेत होण्यासाठी ‘महाराष्ट्र उद्योग-व्यापार व गुंतवणूक सुविधा अध्यादेश’ संमत !
मुंबई – राज्यात देशातून आणि परदेशातून उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी येतात. या उद्योजकांना कालमर्यादेत विविध विभागांच्या अनुमती मिळत नाहीत. त्यामुळे काही उद्योजक परतही जातात. तरी महाराष्ट्रात उद्योजकांची गुंतवणूक सुलभ आणि कालमर्यादेत होण्यासाठी विधानसभेने संमत केलेले ‘महाराष्ट्र उद्योग-व्यापार व गुंतवणूक सुविधा अध्यादेश-२०२३’ विधान परिषदेत २७ जुलैला संमत करण्यात आले. या विधेयकावर सदस्य सुरेश धस, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, जयंत पाटील, अभिजित वंचारी, रणजितसिंह मोहिते-पाटील यांसह अनेक सदस्यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
या संदर्भात बोलतांना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले –
१. कोणत्याही उद्योजकाने आपल्याकडे अनुमती मागितल्यावर ती किती दिवसांत देण्यात यावी, याची कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या कालावधीत त्या विभागाने ही अनुमती न दिल्यास त्या विभागाचे आयुक्त तो निर्णय घेतील. यामुळे परदेशी गुंतवणूक वाढण्यासही साहाय्य होणार आहे. प्रत्येक ३ मासांनी उद्योग विभागाकडे आलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेण्यात येईल.
२. या गुंतवणुकीसाठी आमच्या विभागाची खिडकी २४ घंटे चालू राहील.
३. दाओसला आम्ही गेल्यानंतर १ लाख ३७ सहस्र कोटी रुपयांचे करार केले होते. त्यांपैकी आता १ लाख १ सहस्र कोटी रुपयांच्या करारांच्या जागा संबंधित उद्योगांना देण्यात आल्या असून लवकरच त्यांचे काम चालू होईल.
४. वर्ष २०१९-२० ला महाराष्ट्र उद्योजक गुंतवणुकीत क्रमांक १ वर होते आणि आता गेल्या ११ मासांत राज्य क्रमांक १ वर आहे. ‘एस्.बी.आय.’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात गेल्या ११ मासांत १ लाख १८ सहस्र ४२२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
५. राज्यात अनेक योजना येण्यासाठी आमच्या विभागाचा प्रयत्न असून केंद्राच्या साहाय्याने सातारा येथे ३ सहस्र एकर जागेवर मोठा ‘कॉरिडॉर’ होणार आहे. याचसमवेत रत्नागिरी हापूस आंब्यासाठी ‘मँगो पार्क’, रायगडला ‘लेझर पार्क’ तसेच मराठवाडा, विदर्भ येथील जिल्ह्यांसाठी गुंतवणूक येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
काही सदस्यांनी व्यक्त केलेली मते
१. अभिजित वंचारी – अनेक विभागांनी असा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे या विधेयकाचेही तसे होणार का ?
२. जयंत पाटील – राज्यात जेव्हा जेव्हा गुंतवणूक होईल आणि नवीन उद्योगधंदे येतील, तेव्हा स्थानिक लोकांना ८० टक्के लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र भूषणप्रमाणे उद्योग जगतासाठी उद्योगरत्न पुरस्कार !ज्याप्रमाणे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात येतो त्याप्रमाणे उद्योग जगतासाठी ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार या वर्षी उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात येणार आहे. या व्यतीरिक्त ३ जणांना विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत, असे उद्योगमंत्र्यांनी या वेळी सांगितले. |