जळगाव येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. दत्तात्रय मिठाराम वाघुळदे (वय ६० वर्षे) यांचा साधनाप्रवास !
१. जन्म आणि बालपण
१ अ. श्रीराम मंदिरातील पुजार्यांच्या पत्नीने नवस केल्यामुळे जन्म होणे : ‘माझे वडील ((कै.) मिठाराम कौतिक वाघुळदे) सावदा (तालुका रावेर, जिल्हा जळगाव) येथे एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी मुनीमजींची (मुनीम म्हणजे जमा-खर्चाचा हिशोब लिहिणारा कारकून) नोकरी करत होते. माझ्या वडिलांना ३ मुले झाली; पण ती जन्माला आल्यानंतर ५ व्या दिवशीच वारली. त्यानंतर वडिलांनी नोकरी सोडली. ‘आपल्याला संतती नाही, तर काय करायचे ?’, या विचाराने ते सावदा येथील श्रीराम मंदिरात सेवा करू लागले. त्यानंतर १४ वर्षांनी त्या श्रीराम मंदिराच्या पुजार्यांच्या पत्नीने श्रीरामाला नवस केल्यामुळे माझा जन्म झाला. ‘मुलाचा जन्म नवसाने झाल्यास ६ मास त्याच्यासाठी घरातील वस्त्र वापरायचे नसते’, असा तेथील नियम आहे. त्यामुळे पुजार्याच्या पत्नी मला मंदिरातील श्रीराम आणि लक्ष्मण यांचे वस्त्र नेसायला देत असत. त्या नेहमी सोवळ्यात असायच्या; परंतु मी रामाचा प्रसाद असल्यामुळे मला मांडीवर घेऊन वरण-भात भरवायच्या.
१ आ. लहानपणापासूनच देवाची आवड असणे : मला लहानपणापासूनच देवाची आवड होती. मी देवाच्या सान्निध्यातच वाढलो. लहानपणापासून वडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. लहानपणी श्रीरामासमोर ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥’, हा ज्ञानेश्वरांचा अभंग म्हणत असतांना ‘आपण देवाच्या समोर उभे आहोत, तर आपल्याला लगेच मुक्ती मिळेल’, असे मला वाटायचे. बाबा मला लहानपणी भागवत पुराण, महाभारत आणि रामायण यांतील प्रसंग सांगायचे. त्यामुळे मला राम, कृष्ण आणि हनुमान यांच्याविषयी आवड निर्माण झाली.
१ इ. संतांचे चरित्र वाचणे : आरंभी श्री शंकर महाराज यांचे ‘साद देती हिमशिखरे’ हे पुस्तक वाचल्याने माझी अध्यात्माविषयीची जिज्ञासा जागृत झाली. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मी प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र वाचले.
२. सनातनशी संपर्क आणि साधनेला प्रारंभ
२ अ. सनातनच्या संपर्कात आल्यावर गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आणि सत्संगाला जाणे अन् ‘सनातनमध्येच साधना करूया’, असे वाटणे : माझ्या कार्यालयातील सहकारी श्री. भगत यांनी मला सनातन संस्थेविषयी माहिती सांगितली. त्यानंतर वर्ष १९९७ मध्ये मी सनातनच्या गुरुपौर्णिमेला गेलो. तेथील वातावरण पाहून ‘आपण सनातनमध्येच साधना करूया’, असे मला वाटले. तेव्हा माझी पत्नी (सौ. किरण दत्तात्रय वाघुळदे) माहेरी गेली होती. ‘दोघांनी एकाच वेळी साधनेला आरंभ करूया’, असे वाटून ऑगस्ट १९९७ मध्ये आम्ही डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री गणपति मंदिरात सत्संगाला गेलो. तेथे श्री. विजय विनायक लोटलीकर (आताची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे) आणि (कै.) संपत तनपुरे यांच्या प्रेमभावाने आम्ही भारावून गेलो.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जाहीर सभेच्या ठिकाणी प्रवेश केल्यावर पत्नीचा श्री भवानीदेवीचा नामजप आपोआप चालू होणे आणि त्यानंतर तीच कुलदेवता असल्याचे समजणे : सत्संगात आम्हाला नामजपाचे महत्त्व कळले; पण आम्हाला आमची कुलदेवता ठाऊक नव्हती. त्यामुळे आम्ही ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा जप करत होतो. एकदा भांडुप येथे परात्पर गुरु डॉ. आठवले जाहीर सभेच्या ठिकाणी प्रवेश करत असतांना पत्नीचा श्रीरामाचा चालू असलेला नामजप बंद होऊन ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, असा जप चालू झाला. नामजपात अकस्मात् पालट होण्याचे कारण शोधल्यावर आमची कुलदेवता ‘श्री भवानीदेवी’ असल्याचे आम्हाला कळले.
२ इ. ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा केल्यावर हाताच्या बोटांना सुगंध येणे : डोंबिवली येथे एका सभागृहात अन्य पुस्तकांचे प्रदर्शन होते. तेथे सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावायचे होते. मी श्री. लोटलीकरदादांच्या घरी जाऊन ग्रंथ आणि स्टँड घेऊन सभागृहाच्या बाहेर प्रदर्शन लावले. प्रदर्शन चालू असतांना माझ्या कार्यालयातील एक सहकारी प्रदर्शनस्थळी आले आणि मला म्हणाले, ‘‘हेपण चालू केले का ?’’ त्या वेळी ‘त्यांना काय वाटेल ?’, असा प्रतिमेचा विचार माझ्या मनात आला; परंतु सेवा झाल्यावर त्याविषयी काही वाटले नाही. त्यानंतर मी आणि पत्नीने डोंबिवली येथील खंडोबाच्या देवळात प्रदर्शन लावले. तेव्हा माझ्या हाताच्या बोटांना सुगंध येत असल्याची अनुभूती मला आली.
२ ई. सहसाधिकेने सांगितल्याप्रमाणे प्रथमच प्रवचन केल्यावरही ते गुरुदेवांच्या कृपेने व्यवस्थित होणे : प्रथमच सौ. शोभा तनपुरेकाकूंनी ‘जाधववाडी (डोंबिवली) येथील शिवमंदिरात ‘साधना’ या विषयावर तुम्ही प्रवचन घ्या’, असे मला सांगितले. तेव्हा बर्याच जणांसमोर बोलण्याची माझी पहिलीच वेळ होती, तरी गुरुदेवांच्या कृपेने प्रवचन व्यवस्थित झाले.
२ उ. जळगाव येथे गेल्यावर तेथील साधकांनी सांगितल्याप्रमाणे अकस्मात् सत्संग घेणे आणि त्यानंतर कार्यालयातून घरी आल्यानंतरचा वेळ सेवेसाठी देऊ लागणे : आम्ही जळगाव येथे कामानिमित्त गेलो असतांना श्रीरामाच्या देवळात सत्संगाला गेलो होतो. त्या पूर्वी आम्ही डोंबिवली येथे २ – ३ सत्संगांना गेलो होतो. तेव्हा जळगाव येथील साधक आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही डोंबिवलीहून आला आहात; म्हणून तुम्हीच सत्संग घ्या.’’ तेव्हा मी ‘गुरुकृपायोग’ आणि ‘शिष्य’ हे ग्रंथ वाचलेले होते. त्यांतील एक प्रसंग मी सत्संगात सांगितला. ‘आम्ही दोघांनी १ घंटा सत्संगात विषय कसा घेतला ?’, हे आम्हाला कळलेही नाही. त्यानंतर मी कार्यालयातून घरी आल्यानंतरचा वेळ सेवेलाच देऊ लागलो.
२ ऊ. सनातनच्या साधकांच्या प्रीतीमुळे साधना चालू ठेवणे : मला दम्याचा त्रास झाल्यामुळे मी १ मास सत्संगात गेलो नाही. तेव्हा श्री. लोटलीकरदादांनी संपर्क साधून ‘त्यांनी या रोगावर कशी मात केली ?’, हे मला सांगितले. त्यांचा प्रेमभाव पाहून आम्ही पुन्हा साधना चालू केली. आम्हाला साधकांची प्रीती अनुभवता आली. केरळ येथील श्री. नंदकुमार कैमल आमच्या घरी येऊन आमचा सत्संग घेण्याविषयीचा अभ्यास करवून घ्यायचे आणि सत्संग घ्यायला सांगायचे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध सेवा करणे
मला उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, सभेचे आयोजन करणे’, अशा वेगवेगळ्या सेवा करायला मिळाल्या.
वर्ष २००२ मध्ये पनवेल येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संग घेतला होता. त्यात त्यांनी ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ (म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे.’), असे मला सांगितले. त्यामुळे ‘माझ्या सेवेसाठी गुरुदेवांनी संकल्पच केला’, असे मला वाटले. मला त्यांचे ते शब्द अजूनही आठवतात.
४. वर्ष २००२ ते २००९ या कालावधीत माझे स्वभावदोष, तसेच घर आणि कार्यालय यांतील दायित्वे यांमुळे माझे साधनेचे प्रयत्न न्यून झाले, तरीही गुरुदेवांनी मला साधनेत टिकवून ठेवले.
५. पत्नीने पूर्णवेळ साधना करण्यासाठी जळगाव येथे जाणे
वर्ष २००९ मध्ये मी वाराणसी आणि झारखंड येथे हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या सेवेला १ मास गेल्यावर माझे साधनेचे प्रयत्न वाढले. तेव्हा डोंबिवली येथे सद़्गुरु सत्यवान कदम आले असतांना पत्नीने ‘जळगावला जाऊन पूर्णवेळ साधना करायची आहे’, असा विचार त्यांना सांगितला. सद़्गुरु सत्यवान कदम यांच्या संकल्पामुळे पत्नीला पूर्णवेळ साधना करता आली. आरंभी पूर्णवेळ साधना करण्याची माझी सिद्धता नव्हती. माझ्या मनाचा संघर्ष होत होता. माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. गुरुमाऊलींनी मला नकारात्मक विचारांतून बाहेर काढले. पत्नी आणि मुलगी सायली (आताच्या सौ. सायली दीपक चौधरी) जळगावला घर घेऊन राहू लागल्या. सायली इयत्ता १० वीत असतांनाही पत्नी पूर्णवेळ साधना करू लागली.
६. जळगाव येथे विविध सेवा करणे
वर्ष २०१० ते २०१५ या कालावधीत मी प्रत्येक शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवसांमधे डोंबिवली ते जळगाव प्रवास करून जळगावला सेवेला जाऊ लागलो, तसेच मी गुरुपौर्णिमा आणि हिंदु-राष्ट्र जागृती सभा यांच्या सेवेसाठी १५ दिवस ते १ मास सुटी घेऊन सेवा करू लागलो.
मी जळगाव येथे ‘धर्मशिक्षणवर्ग घेणे, हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी अर्पण मिळवणे’, अशा सेवा करू लागलो. वर्ष २०११ च्या सभेसाठी अर्पण मिळवण्याच्या सेवेसाठी मी आणि पत्नी १० – १२ दिवस प्रतिदिन जेवणाचा डबा घेऊन जळगावच्या एम्.आय्.डी.सी. (महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ) येथे जायचो. तेव्हा जळगावच्या साधकांनी आम्हाला साहाय्य केले. तेव्हा ज्या उद्योगपतींचे संपर्क झाले, त्यांतील काही उद्योगपती अजूनही सनातनच्या कार्याशी जोडलेले आहेत. त्या वेळी ‘वर्गणीदार बनवणे, ग्रंथालयांना ग्रंथांचे वितरण करणे, विज्ञापने घेणे’, या सेवा गुरुमाऊलींनी माझ्याकडून करवून घेतल्या.
७. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करणे
सेवा करत असतांना कार्यालयातील सहकार्यांकडूनही मला साहाय्य मिळत होते. मी ‘रिलायन्स एनर्जी’मध्ये उपमहाव्यवस्थापक या पदावर होतो. मला पूर्णवेळ साधना करायची होती; पण कार्यालयातील सहकारी ‘मोठ्या पगाराची नोकरी सोडू नका’, असे मला सांगत होते. या कालावधीत आम्हा दोघांमध्ये (माझ्यात आणि पत्नीत) नोकरी सोडण्याबद्दल संघर्ष व्हायचा, तरीही गुरुदेवांनी माझ्या मनाची सिद्धता करवून घेतली. मला सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) यांचे साधनेविषयी मार्गदर्शन मिळाले आणि त्यानंतर वर्ष २०१५ मध्ये मी पूर्णवेळ साधना करू लागलो.
८. गुरुमाऊलींनी परिस्थिती स्वीकारायला शिकवून पूर्णवेळ साधना करण्याची मनाची सिद्धता करवून घेणे
वर्ष २०१२ ते २०१५ या कालावधीत आम्ही बाहेर जेवायचो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, या ऋतूंमध्ये प्रत्येक शनिवार-रविवार ज्या आगगाडीत जागा मिळेल, त्या आगगाडीने मी प्रवास करत होतो. ‘प्राप्त परिस्थितीत कसे राहायचे ?’, हे गुरुमाऊलींनी मला शिकवले आणि पूर्णवेळ साधना करण्याची माझ्या मनाची सिद्धता करवून घेतली. वर्ष २०१५ पासून मी पूर्णवेळ साधना करू लागलो.
९. आध्यात्मिक प्रगतीचा विचार मनात आल्यावर सद़्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी सांगितल्याप्रमाणे शरणागतभाव वाढवण्याचे प्रयत्न करणे आणि त्यानंतर गुरुकृपेने ६५ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे
वर्ष २०१२ ते २०१५ या कालावधीत जळगावला मला सद़्गुरु जाधवकाकांचे मार्गदर्शन आणि सहवास मिळाला. तेव्हा ‘माझ्या समवेत असणार्या अन्य साधकांची आध्यात्मिक प्रगती होत आहे. माझी का नाही ?’, असा विचार माझ्या मनात यायचा. त्या वेळी सद़्गुरु काकांनी मला शरणागतभाव वाढवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी प्रयत्न केले. १.४.२०१५ या दिवशी गुरुमाऊलींच्या कृपेने माझी आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. ‘याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे’, असे मला वाटले आणि माझ्याकडून आणखी झोकून देऊन प्रयत्न होऊ लागले.
१०. सेवा करत असतांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन गुणवृद्धी होणे
सेवा करत असतांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन गुणवृद्धी होत आहे. सद़्गुरु जाधवकाकांनी चित्तशुद्धी सत्संग चालू केल्यामुळे स्वभावदोष आणि अहं लक्षात येऊन त्यांच्या मुळाशी जाऊन माझ्याकडून प्रयत्न होत आहेत. सद़्गुरु काका व्यष्टी साधनेचा आढावा घेत असल्यामुळे प्रसंगांचा अभ्यास होत आहे.
११. अनुभूती
हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या प्रसारासाठी बाहेरगावी गेल्यावर घरी चोरी होणे; परंतु चोरांना मौल्यवान वस्तू न सापडणे : वर्ष २०११ मध्ये धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे हिंदु-राष्ट्र जागृती सभा असल्यामुळे आम्ही दोघे (मी आणि पत्नी) ८ दिवस प्रसारासाठी गेलो होतो. त्या वेळी घरात चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केला. घरातील कपाटातील सर्व साहित्य घरभर पसरवले; परंतु त्यात त्याला काही मिळाले नाही. सायलीच्या (मुलीच्या) लग्नासाठी बनवलेले दागिने कपाटातील ज्या कप्प्यात होते, तो कप्पा चोराला उघडताच आला नाही. घराचा वरचा आणि खालचा दरवाजा ५ दिवस उघडाच होता. यावरून ‘सेवेसाठी गेलो, तर देवच घराची काळजी घेतो’, हे माझ्या लक्षात आले.
‘माझा साधनाप्रवास गुरुमाऊलींच्या इच्छेनुसार होत आहे. त्यांच्या कृपेमुळेच मला सतत सेवेत रहाता येत आहे’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘माझ्याकडून साधनेचे पुढील प्रयत्नही त्यांनीच करवून घ्यावेत’, हीच त्यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– श्री. दत्तात्रय मिठाराम वाघुळदे (वय ६० वर्षे), जळगाव (१.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |