कर्करोगाला धीरोदात्तपणे सामोरे जाणार्या सनातनच्या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे निधन !
कोल्हापूर – कर्करोगाला धीरोदात्तपणे सामोरे जाऊन इतरांसमोर आदर्श निर्माण करणार्या कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे २७ जुलै या दिवशी रुग्णालयात दुपारी १ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. त्यांच्यावर रायगाव (कराड) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई श्रीमती उषा जाधव, एक विवाहित बहीण, भावोजी, भाचा, ३ काका, ५ काकू, १० चुलत बहिणी, १२ चुलत भाऊ, असा परिवार आहे. वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव या आयुर्वेदात एम्.डी. होत्या. त्या धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापिका म्हणून ५ वर्षांपासून कार्यरत होत्या. तत्पूर्वी त्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, कोडोली येथेही सुमारे १० वर्षे प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. महाविद्यालयातही त्या इतरांना साहाय्यासाठी धावून जाणार्या आणि मनमिळाऊ वैद्या म्हणून प्रसिद्ध होत्या.
२६ जुलै या दिवशी जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे घोषित !सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी २६ जुलै या दिवशी वैद्या सुजाता जाधव यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे सांगितले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा हा संदेश कोल्हापूर येथील सनातनचे साधक डॉ. अरुण करमळकर, सौ. अनिता करमळकर, श्री. अजय पाटील आणि सौ. संगिता पाटील यांनी वैद्या सुजाता जाधव यांची रात्री १०.१५ वाजता रुग्णालयात भेट घेऊन दिला. या वेळी वैद्या सुजाता यांना ग्लानी होती. त्यामुळे डॉ. अरुण करमळकर यांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानात ही आनंदवार्ता सांगितली. ही आनंदवार्ता ऐकल्यानंतर त्यांच्या चेहर्यावरील भाव पालटले. यावरून ‘त्यांना ही आनंदवार्ता समजली’, हे साधकांच्या लक्षात आले. गुरुदेवांनी सुजाताला कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ देऊन तिला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले ! – श्रीमती उषा जाधव (वैद्या सुजाता जाधव यांची आई)या प्रसंगी वैद्या सुजाता यांच्या आई श्रीमती उषा जाधव यांना पुष्कळ आनंद झाला, तसेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या विषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या म्हणाल्या, ‘‘आज दिवसभर मला आतून आनंद जाणवत होता आणि रात्री ही आनंदवार्ता समजली. गुरुदेवांनी सुजाताला कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ देऊन तिला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले. गुरुदेवांविषयी किती कृतज्ञता व्यक्त करायची, हे समजत नाही.’’ त्यानंतरही श्रीमती उषा जाधव कृतज्ञताभावातच होत्या. |
वैद्या सुजाता जाधव यांचे निधन झाल्यावर वातावरणात आनंद आणि उत्साह जाणवणे
वैद्या सुजाता जाधव यांचे निधन झाल्यावर रुग्णालयात उपस्थित असणारे साधक आणि त्यांचे नातेवाईक यांना वातावरणात कोणत्याही प्रकारचा दाब किंवा ताण जाणवला नाही, तर आनंद आणि उत्साहच जाणवत होता.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आणि प्रसाद दिल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे !
२७ जुलैला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वैद्या सुजाता जाधव यांच्या संदर्भातील त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. सनातनच्या साधकांनी सकाळी ९.३० वाजता वैद्या सुजाता जाधव यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना दैनिक आणि प्रसाद दिला. या प्रसंगी त्यांची आई श्रीमती उषा जाधव आणि अन्य नातेवाइक उपस्थित होते.
वैद्या सुजाता जाधव या ईश्वराच्या अनुसंधानात असून त्या शांत आणि स्थिर असल्याचे साधकांना जाणवणे
सकाळी वैद्या सुजाता जाधव यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्या अर्धबेशुद्ध अवस्थेत होत्या. तरीही दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक दाखवल्यावर त्यांनी तो बघण्याचा प्रयत्न केला. ‘त्या जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या आहेत’, हे त्यांच्या लक्षात आले’, असे उपस्थित साधकांना जाणवले. ‘त्या ईश्वराच्या अनुसंधानात आहेत, तसेच त्या अत्यंत शांत आणि स्थिर आहेत’, असे त्यांच्या चेहर्यावरून साधकांना जाणवले.
उंचगाव (कोल्हापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. नीटनेटकेपणा
‘वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव ही १२ वीत असल्यापासून आम्ही तिला ओळखतो. तिच्या घरी उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे सत्संग असे. त्या सत्संगासाठी घर स्वच्छ करून नीटनेटकी सिद्धता करण्याची सेवा ती मनापासून करत असे. त्यामुळे सत्संगातील वातावरण प्रसन्न अन् चैतन्यमय असायचे. तिचा नीटनेटकेपणा कौतुकास्पद आहे.
२. सेवेची तळमळ
अ. तिने अनेक वर्षे विज्ञापनांची सेवा केली. ती महाविद्यालय सुटल्यावर किंवा नोकरी लागल्यावरही घरी न जाता परस्पर सेवाकेंद्रात जाऊन सेवा पूर्ण करत असे. ही सेवा करतांना ती सहसाधकांच्या समवेत अतिशय प्रेमाने आणि सहकार्याने वागून आणि सेवा पूर्ण करूनच घरी जात असे. या सेवेसाठी तिने काही साधकांनाही सिद्ध केले आहे.
आ. कोल्हापूरमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना ती साधकांना समवेत घेऊन सेवा परिपूर्ण करत असे.
३. रुग्ण साधकांवर औषधोपचार करणे
तिने आयुर्वेदातील ‘एम्.डी.’ ही उच्च पदवी संपादन केली आहे. तिला उत्तम वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे अनेक साधक तिला वैद्यकीय उपचारांविषयी विचारत असत. स्वतःची नोकरी आणि सेवा यांतून वेळ काढून ती साधकांवर योग्य औषधोपचार करत असे. साधकांना तिचा मोठा आधार वाटत असे.
४. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला हसतमुखाने सामोरे जाणे
या गुणी साधिकेला दुर्दैवाने मे २०२१ मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले. स्वतः वैद्या असल्यामुळे तिला या आजाराची पूर्ण कल्पना होती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर नितांत श्रद्धेच्या बळावर ती या आजाराला हसतमुखाने सामोरी जात होती.’
– आधुनिक वैद्य शिवदान गोरे-देशमुख (आध्यात्मिक स्तर ६४ टक्के, वय ८४ वर्षे) आणि सौ. उमा गोरे-देशमुख (आध्यात्मिक स्तर ६३ टक्के, वय ७३ वर्षे) कोल्हापूर सेवाकेंद्र (२५.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |