कॉन्व्हेंट शाळांच्या ऐवजी चांगल्या संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा ! – गौरी द्विवेदी, मुख्याध्यापिका, रुद्रप्रयाग विद्या मंदिर, उत्तरप्रदेश
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन विशेष संवाद’ : ‘कॉन्व्हेंट (इंग्रजी माध्यमांच्या) शाळांचा विरोध टिकलीला कि हिंदु धर्माला ?’
मुंबई – कॉन्व्हेंट शाळांमध्ये विशिष्ट अटी ठेवून शिक्षण दिले जाते; मात्र तेथे शिक्षण घेणारी बहुतांश मुले हिंदु असतात. त्यामुळे अशा शाळांमध्ये हिंदु संस्कृतीचा अंतर्भाव असलेले शिक्षण देण्याची व्यवस्था हवी आणि यामध्ये भेदभाव झाल्यास हिंदु मुलांच्या पालकांनी त्या शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी हिंदु संस्कृतीपासून दूर जात आहेत. ‘इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थीच यशस्वी होईल’, या अपसमजातून पालकांनी आता बाहेर आले पाहिजे. ‘विद्यार्थी संस्कारी झाल्यावरच यशस्वी होईल’, हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक शिक्षण देण्यासह संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये स्वतःच्या मुलांसाठी निवडा, असे आवाहन प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ‘रुद्रप्रयाग विद्या मंदिरा’च्या मुख्याध्यापिका गौरी द्विवेदी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कॉन्व्हेंट शाळांचा विरोध टिकलीला कि हिंदु धर्माला ?’, या विषयावर आयोजित विशेष संवादात त्या बोलत होत्या.
कॉन्व्हेंट शाळांचा ‘अल्पसंख्यांक’ दर्जा काढा ! – नागेश जोशी, पुणे समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
बहुतांश कॉन्व्हेंट शाळांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक हिंदु विद्यार्थी शिकत असल्याचे उघड !
झारखंड येथील एका कॉन्व्हेंट शाळेत कपाळावर टिकली लावली म्हणून शिक्षिकेने एका विद्यार्थिनीच्या थोबाडीत मारली. या अपमानामुळे उषा कुमारी या हिंदु विद्यार्थीनीने आत्महत्या केली. हे छळाचे पहिले उदाहरण नसून यापूर्वी देशभरात ठिकठिकाणी कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यां समवेत असे प्रकार घडले आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने हिंदु विद्यार्थ्यांना शाळांमधून हिंदु धर्माचे शिक्षण द्यायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. आज अनेक कॉन्व्हेंट शाळांमधून केवळ ख्रिस्ती पंथाचे शिक्षण दिले जाते. हिंदु धर्मावर टीका केली जाते. सध्या कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जात असून या शाळा हिंदूंच्या धर्मांतराची केंद्रे बनत आहेत. बहुतांश कॉन्व्हेंट शाळांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक हिंदु विद्यार्थी शिकतात. त्यामुळे कॉन्व्हेंट शाळांचा ‘अल्पसंख्यांक दर्जा’ सरकारने काढून घेतला पाहिजे.
सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतात ! – डॉ. पूजा, संयुक्त अध्यक्षा, कस्तुरबा विद्यानिकेतन, धोरी (झारखंड)
कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी विदेशी संस्कृतीचे अनुकरण करतात. कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकणारी मुले निराशेत जात असल्याचे आढळून आले आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये जाणारी मुले आपली भारतीय संस्कृती विसरतात. याउलट सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण करणारी मुले आत्मबळाने युक्त असतात. अशी मुले निराशेची शिकार होत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. कॉन्व्हेंट व्यतिरिक्त अनेक शाळांमध्ये इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे शिकवली जाते. आमच्या देशभरातील विद्याभारती शाळांमध्ये हा प्रयत्न चालू आहे.