आधार नोंदणी केल्यास राज्यातील २०-२५ टक्के विद्यार्थी बोगस आढळतील ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
मुंबई – मागील काही काळापासून आपण राज्यातील शाळांची पटपडताळणी करत आहोत; मात्र ती पूर्ण होऊ शकलेली नाही. पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होऊ शकलेली नाही. ज्या दिवशी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होईल, तेव्हा २०-२५ टक्के विद्यार्थी अस्तित्वात नसल्याचे किंवा अनेक ठिकाणी नोंदणी असल्याचे आढळून येतील, असे भाष्य विधानसभेत शिक्षणक्षेत्राच्या गंभीर स्थितीविषयी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २७ जुलै या दिवशी शिक्षण विभागामध्ये बढती आणि स्थानांतर यांसाठी पैसे घेण्यात येत असल्याविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देतांना गृहमंत्र्यांनी वरील धक्कादायक शक्यता व्यक्त केली.