प्रेमळ, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात असणार्या उंचगाव (कोल्हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
२१.७.२०२३ या दिवशी वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव साधकांना भेटण्यासाठी कोल्हापूर सेवाकेंद्रात आल्या होत्या. त्या वेळी सेवाकेंद्रातील सर्व साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. स्थिरता आणि प्रसन्नता
‘वैद्या सुश्री (कु.) सुजाताताई यांना कर्करोग झालेला असल्याने त्यांना यातना होत होत्या, तरीही त्यांच्या चेहर्यावर स्थिरता आणि प्रसन्नता जाणवत होती. साधकांना बघून त्यांना पुष्कळ आनंद झाला.
२. प्रेमभाव
सेवाकेंद्रात आल्यानंतर त्यांनी सर्व साधकांची आपुलकीने विचारपूस केली. त्या वैद्या असल्याने पूर्वी काही साधक त्यांच्याकडून औषध घेत होते. त्यामुळे त्यांनी त्या सर्वांची आठवणीने विचारपूस केली.
३. सुजाताताईंना बघण्यासाठी सगळे साधक उभे असतांना ‘सर्व जण बसा. माझ्यासाठी उभे राहू नका’, असे त्या सांगत होत्या.
४. साधकांप्रतीचा आदर
आधुनिक वैद्य शिवदान गोरे-देशमुख (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८३ वर्षे) आणि सौ. उमा गोरे-देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७४ वर्षे) हे दोघे समोर आल्यानंतर ताईंना उठायला जमत नसूनही त्यांनी आसंदीतून उठून उभे राहून त्यांना नमस्कार केला.
५. इतरांचा विचार करणे
सौ. उमा गोरे-देशमुखकाकू तिच्या बाजूला उभ्या होत्या. ताईंनी एका साधिकेला काकूंना आसंदी देण्यास सांगितले.
६. साधकत्व
त्यांनी सेवाकेंद्रातील नवीन साधकांची स्वतःहून ओळख करून घेतली, तसेच समवेत आलेल्या त्यांच्या नातेवाइकांची सेवाकेंद्रातील सर्व साधकांशी ओळख करून दिली. ताईंना सहज बोलायलाही पुष्कळ अडचणी येत होत्या, तरीही त्या सर्वांशी प्रेमाने बोलत होत्या. ‘त्यांचे वागणे साधकत्वाला धरून आहे’, हे पदोपदी सर्वांच्या लक्षात येत होते.
७. सेवाकेंद्राप्रतीचा भाव
अ. सेवाकेंद्रात प्रवेश करण्यापूर्वी साधकांनी त्यांना सांगितले, ‘‘पायांत चप्पल असू दे.’’ ताईंच्या पायांना सूज असल्याने त्यांना चप्पल काढता येत नव्हती; पण त्या म्हणाल्या, ‘‘मी चप्पल काढण्याचा प्रयत्न करते. सेवाकेंद्रात चप्पल घालायला नको.’’
आ. ताईंना खाऊ दिल्यावर त्यांना तो खायला अडचण होत होती; पण ‘ गोव्यातील सनातनच्या आश्रमात बनवलेले बिस्किट आहे’, असे त्यांना सांगितल्यावर त्यांनी ते प्रसाद म्हणून ग्रहण केले.
८. संतांप्रतीचा भाव
ताई सेवाकेंद्रात आल्यानंतर त्यांना उभे रहायला जमत नव्हते, तरीही पू. सदाशिव (भाऊ) परब (सनातनचे २६ वे (समष्टी) संत) समोर आल्यानंतर त्या आसंदीतून उठल्या आणि त्यांनी पू. भाऊकाकांना वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. जणूकाही ‘त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटत आहेत’, असे त्यांच्याकडे पाहून सर्वांना वाटत होते. त्यांच्या चेहर्यावर तसा भाव जाणवत होता.
९. पू. सदाशिव (भाऊ) परब सुजाताताईंशी बोलत असतांना ‘पू. भाऊकाकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले बोलत आहेत’, असे सर्व साधकांना वाटणे आणि सर्व साधकांची भावजागृती होणे
‘पू. भाऊकाका त्यांच्याशी बोलत असतांना त्यांच्या माध्यमातून जणू परम पूज्य गुरुदेव त्यांच्याशी बोलत आहेत’, असे सर्व साधकांना जाणवत होते. त्या दोघांमधील संभाषणात चैतन्य जाणवत होते. त्या वेळी सर्वांना परम पूज्य गुरुदेवांचे प्रत्यक्ष अस्तित्व प्रकर्षाने जाणवले. परम पूज्य गुरुदेव बोलत असतांना जसे हात हलवतात आणि ते ज्याप्रमाणे साधकांची विचारपूस करतात, त्याप्रमाणेच पू. भाऊकाकाही करत होते. त्यामुळे ‘परम पूज्य गुरुदेव आले आहेत’, असे वाटून सर्व साधकांची भावजागृती झाली.
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
एका साधकाला २ वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्या कालावधीत सुजाताताईंचे सेवाकेंद्रात येणे-जाणे नव्हते; पण संबंधित साधक दिसला नाही; म्हणून त्यांनी ‘ते साधक कुठे आहेत ? बरे आहेत ना ?’, असे विचारले. ते साधक समोर आल्यानंतर ताई त्यांना म्हणाल्या, ‘‘दादा, तुमच्यावर खूप मोठी गुरुकृपा झालेली आहे.’’ हे वाक्य ऐकल्यावर सर्व साधकांना कृतज्ञताभाव अनुभवता आला.
११. ‘सेवाकेंद्रात यायला मिळाले’, याबद्दल ताईंना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘पुष्कळ दिवसांपासून मला सेवाकेंद्रात येऊन सर्वांना भेटावेसे वाटत होते. आज माझी ती इच्छा पूर्ण झाली’, असे त्यांनी सांगितले.
या वेळी आम्हा साधकांना ‘देव सर्वतोपरी सर्वांची काळजी घेत असतो’, याची सर्वांना जाणीव झाली. ‘संतांच्या माध्यमातूनही साधकांच्या समवेत गुरुदेव सदैव असतात’, हे सर्वांच्या लक्षात आले.
‘परात्पर गुरुदेवांनी काही क्षणांतच सुजाताताईंकडून इतके गुण शिकण्याची संधी आम्हा सर्व साधकांना दिली’, याबद्दल आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– कोल्हापूर सेवाकेंद्रातील सर्व साधक (२३.७.२०२३)