साधकांनो, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्‍यात्‍मविश्‍वातून भगीरथ प्रयत्न करून भूलोकात आणलेल्‍या भक्‍तीसत्‍संगरूपी ‘भक्‍तीगंगे’चे माहात्‍म्‍य जाणा आणि साधनेच्‍या प्रयत्नांमध्‍ये वाढ करून त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ करून घ्‍या !

‘१३.७.२०२३ या दिवशी ३०० वा भक्‍तीसत्‍संग झाला. या निमित्ताने सूक्ष्म परीक्षण आणि ईश्‍वरी ज्ञान या माध्‍यमांतून अनुभवायला मिळालेली भक्‍तीसत्‍संगाची आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

यातील काही भाग आपण २०.७.२०२३ या दिवशी पाहिला आज उर्वरित भाग पाहूया. (भाग २)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

६. समष्‍टीच्‍या भावपूर्ण याचनेमुळे विविध देवीदेवता आणि ऋषिमुनी यांनी भक्‍तीसत्‍संगात उपस्‍थित रहाणे

‘भगवंत भावनांच्‍या पलीकडे असल्‍यामुळे तो अधिकतर साक्षीभावात असतो आणि भक्‍तांनी प्रार्थना केल्‍यावर ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्‍यायाप्रमाणे वागतो. ज्‍या वेळी समष्‍टी भावपूर्ण याचना करते, त्‍या वेळी ईश्‍वरी शक्‍तीला प्रगट व्‍हावेच लागते. यामुळे भक्‍तीसत्‍संगातही विविध कथा, प्रसंग इत्‍यादींतून ज्‍या वेळी विविध देवता, ऋषिमुनी आणि भक्‍त यांना भावपूर्ण आवाहन केले जाते, त्‍या वेळी समष्‍टीच्‍या आर्त याचनेमुळे संबंधित देवता, ऋषिमुनी आणि संत त्‍या त्‍या वेळी सूक्ष्मातून भक्‍तीसत्‍संगात उपस्‍थित रहातात.

७. भक्‍तीसत्‍संगामुळे साधकांमध्‍ये समष्‍टी शिष्‍याचे गुण आणि अल्‍प कालावधीत भक्‍ती निर्माण होत असणे अन् त्‍यामुळे श्रीविष्‍णूने योगनिद्रा, तर भगवान शिवाने ध्‍यान त्‍यागून सत्‍संगावर दृष्‍टीक्षेपाने कृपावर्षाव करणे

श्री. निषाद देशमुख

विशिष्‍ट पंथ किंवा संस्‍था यांच्‍या सत्‍संगात एकाच देवतेचे किंवा एकाच संतांचे गुणवर्णन केले जाते किंवा शिकवले जाते. त्‍यामुळे त्‍या पंथाच्‍या साधकांमध्‍ये शिकण्‍याची विकसित दृष्‍टी निर्माण होत नाही. या पंथात अधिकाधिक व्‍यष्‍टी साधनेसाठी पूरक गुण निर्माण होतात आणि ते निर्माण होण्‍यास १५ ते २० वर्षांचा कालावधी लागतो.

याउलट भक्‍तीसत्‍संगात विविध देवता, ऋषिमुनी आणि भक्‍त अशा सर्वांकडून शिकण्‍यासारख्‍या गुणांचे वर्णन केले जाते. अशा प्रकारे भक्‍तीसत्‍संगाच्‍या माध्‍यमातून प्रायोगिक अध्‍यात्‍म शिकवले गेल्‍यामुळे त्‍यात सहभागी साधकांमध्‍ये समष्‍टी शिष्‍याचे गुण आणि भक्‍ती निर्माण होते. भक्‍तीसत्‍संगात सहभागी होणार्‍या साधकांची सरासरी आध्‍यात्मिक पातळी ५० टक्‍के आहे. ५० टक्‍के पातळीच्‍या साधकांमध्‍ये भावाचे प्रमाण १० टक्‍के असून ते ३० टक्‍के (भक्‍तीचे न्‍यूनतम प्रमाण) होण्‍यासाठी त्‍यांना २० वर्षे साधनेचे प्रयत्न करणे आवश्‍यक असते; याउलट वर्ष २०१६ पासून चालू असलेल्‍या भक्‍तीसत्‍संगाला जेमतेम ७ वर्षे होत आहेत, तरी भक्‍तीसत्‍संगात सहभागी साधकांमधील भावाचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. थोडक्‍यात भक्‍तीसत्‍संगामुळे साधकांमध्‍ये तिप्‍पट गतीने भक्‍ती निर्माण होत आहे. हे भक्‍तीसत्‍संगाचे एक आगळेवेगळे वैशिष्‍ट्य होय.

भक्‍तीसत्‍संगातून भक्‍तीयुक्‍त समष्‍टी साधनेची शिकवण दिली जाते. त्‍यामुळे पृथ्‍वीवर सत्‍संग चालू झाल्‍यावर निरंतर योगनिद्रेत असणारा भगवान श्रीविष्‍णु आणि निरंतर ध्‍यानावस्‍थेत असणारा भगवान शिव हे अनुक्रमे योगनिद्रा अन् ध्‍यान त्‍यागून भक्‍तीसत्‍संगाकडे त्‍यांचा कृपाकटाक्ष टाकतात. भगवान शिव आणि भगवान श्रीविष्‍णु यांच्‍या कृपाकटाक्षामुळे भक्‍तीसत्‍संग ज्ञान अन् भक्‍ती यांनी युक्‍त होतो.

८. भक्‍तीसत्‍संगात घेण्‍यात येणार्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगांमुळे विविध देवतालोकांकडे जाणारा सूक्ष्म मार्ग उघडा होणे

भक्‍तीसत्‍संगात घेण्‍यात येणार्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगांत ज्ञान आणि भक्‍ती कार्यरत असते. त्‍यामुळे ज्‍या वेळी भक्‍तीसत्‍संगातील सर्व भक्‍त एकत्रितपणे भावजागृतीचा प्रयोग करतात, त्‍या वेळी समष्‍टी भाव जागृत होतो. या समष्‍टी भावामुळे भूलोकाची शुद्धी होऊन विविध देवतालोकांकडे जाणारे सूक्ष्म मार्ग, जे समष्‍टी रज-तमामुळे बंद झालेले असतात, ते तात्‍कालिक काळासाठी (सत्‍संगाच्‍या काळापुरते) उघडतात. त्‍यामुळे भावजागृतीचे विविध प्रयोग करतांना वैकुंठ, कैलास, दत्तलोक, तसेच सत्‍ययुग, अशा विविध दैवी वायूमंडलांची अनुभूती समष्‍टीला सहजतेने येते.

९. भक्‍तीसत्‍संगाच्‍या व्‍याप्‍तीत वाढ झाल्‍यामुळे सूक्ष्मातून गोलोकाचे वायूमंडल निर्माण होणे आणि भक्‍तीसत्‍संगातील चैतन्‍याचा ६ व्‍या पाताळापर्यंत परिणाम होणे

वर्ष २०१६ पासून चालू झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगाची आध्‍यात्मिक क्षमता आणि त्‍याची व्‍याप्‍ती प्रत्‍येक वर्षी वाढत आहे. जसजशी भक्‍तीसत्‍संगात सांगण्‍यात येणारी माहिती समष्‍टीला काळानुसार अधिकाधिक पूरक होत आहे, तसतशी भक्‍तीसत्‍संगाकडे येणार्‍या चैतन्‍याच्‍या स्‍तरातही वाढ होत आहे. वर्ष २०२२ पर्यंत सत्‍यलोकातील चैतन्‍य भक्‍तीसत्‍संगात आकृष्‍ट होत होते. आता भक्‍तीसत्‍संगाची व्‍याप्‍ती वाढल्‍यामुळे सप्‍तलोकांच्‍या पलीकडे असलेले गोलोकातील (टीप) चैतन्‍य भक्‍तीसत्‍संगाकडे आकृष्‍ट होत आहे. गोलोकात निर्गुण तत्त्व कार्यरत असते. त्‍यामुळे भक्‍तीसत्‍संग चालू असतांनाही वातावरणात दैवी पालट होण्‍याची अनुभूती साधक सहजतेने अनुभवतात.

भक्‍तीसत्‍संगाकडून पाताळाच्‍या दिशेने प्रक्षेपित होणार्‍या चैतन्‍यातही वाढ झाली आहे. वर्ष २०२२ पर्यंत भक्‍तीसत्‍संगातील चैतन्‍य अधिकाधिक ५ व्‍या पाताळापर्यंत परिणाम करत होते. आता त्‍यात वाढ होऊन ६ व्‍या पाताळापर्यंत सत्‍संगाच्‍या चैतन्‍याचा परिणाम होत आहे. भक्‍तीसत्‍संगामुळे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होण्‍याची अनुभूतीही साधकांना सहजतेने येत आहे.

टीप – गोलोक : भू, भुव, स्‍वर्ग, महर्, जन, तपस् आणि सत्‍य, असे सप्‍तलोक आहेत. अध्‍यात्‍मातील काही उन्‍नतांच्‍या मते या सप्‍तलोकांच्‍या पलीकडे लाखो योजने परिसरात ‘गोलोक’ स्‍थित आहे. (१ योजन = १२.८ कि.मी.) गोलोक म्‍हणजे गायींचा लोक किंवा श्रीकृष्‍णाचा लोक. गोलोक हा सर्व लोकांचा आधार आहे. गोलोकाच्‍या दक्षिण भागात शिवलोक, तर उत्तर भागात विष्‍णुलोक स्‍थित आहे. ब्रह्मांडातील सर्व देवतांचे लोक गोलोकात स्‍थित आहेत. या लोकात उन्‍नत भक्‍त आणि संत यांनाच प्रवेश असतो.

१०. भक्‍तीसत्‍संगामुळे साधकांमध्‍ये झालेले आध्‍यात्मिक पालट

१० अ. भक्‍तीत वाढ झाल्‍याने मंद प्रारब्‍धामुळे होणार्‍या त्रासांवर मात करण्‍याची क्षमता निर्माण होणे : भक्‍तीसत्‍संगातील चैतन्‍य साधकांच्‍या थेट अनाहतचक्रावर परिणाम करते. अनाहतचक्र मनोमयकोषाशी निगडित असल्‍यामुळे साधकांच्‍या मनाची शुद्धी होऊन त्‍यांच्‍या मनावर भक्‍तीचे संस्‍कार होतात. अशा प्रकारे मनावर निरंतर भक्‍तीचे संस्‍कार झाल्‍यामुळे अनेक साधकांमध्‍ये भक्‍तीच्‍या बळावर मंद प्रारब्‍धामुळे होणार्‍या त्रासांवर मात करण्‍याची क्षमता निर्माण झाली आहे.

१० आ. दीर्घकाळ आणि अधिक प्रमाणात ईश्‍वरी चैतन्‍य अनुभवता येणे : ‘भाव तिथे देव’, या उक्‍तीप्रमाणे विविध सण, उत्‍सव यांपूर्वी एक आठवडा किंवा १० दिवस साधक त्‍या देवता, सण किंवा उत्‍सव या संदर्भात भावजागृतीचे प्रयत्न करणे चालू करतात. त्‍यामुळे साधकांच्‍या भावानुसार त्‍यांना एक आठवडा किंवा १० दिवस १०० ते १ सहस्र पट या प्रमाणात देवतातत्त्व अनुभवता येते. थोडक्‍यात भावजागृतीच्‍या प्रयत्नांमुळे साधकांना दीर्घकाळ आणि अधिक प्रमाणात देवतातत्त्व अनुभवता येत आहे.

१० इ. भक्‍तीसत्‍संगातील शिकवणीमुळे कर्तेपणा ईश्‍वरचरणी अर्पण केल्‍यामुळे साधकांचे देवाण-घेवाण हिशोब न्‍यून होऊन त्‍यांची आध्‍यात्मिक प्रगती होणे : प्रत्‍येक मनुष्‍याला ईश्‍वर ईश्‍वरप्राप्‍ती करण्‍यासाठी क्रियमाण कर्म करण्‍याची क्षमता देतो; पण मनुष्‍य त्‍याचा उलट वापर करून स्‍वतःच्‍या देवाण-घेवाणीतच वाढ करतो. भक्‍तीसत्‍संगातील प्रत्‍येक कर्माचे कर्तेपण ईश्‍वराला अर्पण करण्‍याच्‍या शिकवणीमुळे आता बर्‍याच साधकांच्‍या मनातील कर्तेपणाचे विचार न्‍यून होत आहेत. साधकांनी त्‍यांचे कर्तेपण ईश्‍वरचरणी अर्पण केल्‍यामुळे त्‍यांचा देवाण-घेवाण हिशोब न्‍यून होणे चालू होऊन त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक प्रगतीला आरंभ झाला आहे. ही भक्‍तीसत्‍संगाची फलनिष्‍पत्ती आहे.

१० ई. भक्‍तीसत्‍संगामुळे साधकांची प्रल्‍हादाप्रमाणे समष्‍टी भक्‍त होण्‍याच्‍या दिशेने वाटचाल होणे : ‘भक्‍ती म्‍हणजे निरपेक्ष समर्पण.’ जो निरपेक्षपणे गुरूंनी सांगितलेले व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेचे प्रयत्न करतो, तो समष्‍टी भक्‍त होतो. समष्‍टी भक्‍ताचे मूर्तीमंत उदाहरण म्‍हणजे ‘भक्‍त प्रल्‍हाद.’ भक्‍त प्रल्‍हाद श्रीविष्‍णुभक्‍तीचा प्रसार करायचा; म्‍हणून त्‍याचे वडील असलेल्‍या राक्षस हिरण्‍यकश्‍यपूने त्‍याला जिवे मारण्‍याचे अनेक प्रयत्न केले. असे असूनही प्रल्‍हाद निरंतर हरिनामस्‍मरणात गुंग असायचा. त्‍याला ‘देवाने माझे रक्षण करावे’, अशी अपेक्षाही नव्‍हती. अशा प्रकारे निरपेक्ष व्‍यष्‍टी साधना (नामजप) आणि समष्‍टी साधना (अध्‍यात्‍मप्रसार) यांमुळे प्रल्‍हाद ‘समष्‍टी भक्‍त’ झाला. त्‍याच्‍यात धर्मराज्‍य चालवण्‍याची क्षमता निर्माण झाली, तसेच तो ईश्‍वरेच्‍छेशीही एकरूप झाला. त्‍यामुळे ज्‍या वेळी हिरण्‍यकश्‍यपूच्‍या पापांचा घडा भरला, त्‍या वेळी प्रल्‍हादच भगवंताला आवाहन करण्‍याचे माध्‍यम झाला आणि त्‍याच्‍या भक्‍तीमुळे स्‍वतः श्रीविष्‍णुच उग्र नृसिंह रूप धारण करून प्रल्‍हादाने सांगितलेल्‍या खांबातून प्रगट झाला. भगवान नृसिंहाने हिरण्‍यकश्‍यपूचा वध केला आणि प्रल्‍हादाला राज्‍यकारभार दिला, म्‍हणजे धर्मसंस्‍थापना केली आणि तो अंतर्धान पावला.

भक्‍तीसत्‍संगामुळे साधकांचीही काही प्रमाणात प्रल्‍हादासारखी व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना होऊन त्‍यांची समष्‍टी भक्‍त होण्‍याकडे वाटचाल होत आहे.

११. भक्‍तीसत्‍संगाचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ घेण्‍यासाठी साधकांनी त्‍यांच्‍या प्रयत्नांमध्‍ये वाढ करणे आवश्‍यक !

भक्‍तीसत्‍संगाची अनेक आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये असून त्‍यांचे आचरण केल्‍यावर साधकांना अनुभूतीही येतात; पण वर्तमानकाळाची गती जेवढी आहे, तेवढ्या गतीने साधक भक्‍तीसत्‍संगाचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ घेत नाहीत. सध्‍या साधक केवळ ३५ टक्‍के एवढाच भक्‍तीसत्‍संगाचा आध्‍यात्मिक लाभ करून घेत आहेत.

भक्‍तीसत्‍संग म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्‍यात्‍मविश्‍वातून भगीरथ प्रयत्न करून भूलोकात आणलेली ‘भक्‍तीगंगा !’ साधकांनी या भक्‍तीगंगेचे भावपूर्ण दर्शन घेणे, इथपर्यंत मर्यादित न रहाता भक्‍तीगंगेत स्नान करून म्‍हणजेच तन, मन, धन आणि सर्वस्‍व यांचा त्‍याग करून अन् स्‍वतःची अंतर्बाह्य शुद्धी करून जन्‍म-मृत्‍यूच्‍या चक्रातून मुक्‍त होणे अपेक्षित आहे.

‘साधकांना भक्‍तीसत्‍संगाचा आध्‍यात्मिक लाभ घेता येण्‍यासाठी श्री गुरूंनी त्‍यांना भक्‍ती, शक्‍ती आणि बुद्धी द्यावी’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’

(समाप्‍त)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक