अधिक मासामध्ये कोणती कर्मे करावीत ? आणि कोणती करू नये ?
अधिक मासाविषयी शास्त्रोक्त माहिती
‘२६ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात अधिक मास आणि क्षयमास यांविषयीची माहिती वाचली. धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करतांना धर्मकृत्यांमधील संज्ञा अत्यंत महत्त्वाच्या असतात, हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. अनेकांना संज्ञा माहिती नसल्यामुळे त्यांचे चुकीचे अर्थ लावतात. धर्मकृत्यांचे अनन्यगतिक आणि सगतिक अशी दोन महत्त्वाची कर्मे आहेत.
(भाग २)
३. अनन्यगतिक म्हणजे काय ?
जे कर्म केल्यावाचून सोय नाही, अशी नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्मे अधिक किंवा क्षयमासात करावीत. उदा. नित्य संध्या, अग्निहोत्र, वैश्वदेव, देवपूजा, पंचमहायज्ञ ही नित्य, म्हणजे प्रतिदिन करणे आवश्यक आहेत. ही नित्यकर्मे अधिक मासामध्ये करावीत. ग्रहणस्नान आदी नैमित्तिक (काही विशेष निमित्ताने होणारी) कर्मे करावीत. पर्जन्यासंबंधी, कारीर्यादि, ब्रह्मराक्षस वगैरे आभिचारीक आणि आसुरी पीडा शमनार्थ ‘रक्षोघ्नेष्टि’ इत्यादी काम्यकर्मे (इच्छित कर्मे) अधिक मासात करावीत.
४. सगतिक कर्मे म्हणजे काय ?
जी कर्मे पुढे करता येतील, अशी नित्य नैमित्तिक काम्यकर्मे होय. ही कर्मे अधिक मासात करू नयेत. ज्योतिष्टोमादि नित्य, जातेष्टि आदी करून नैमित्तिक आणि पुत्रकामेष्टि आदी काम्य कर्मे शुद्ध मासात, म्हणजे अधिक मासानंतर करावीत.
५. कोणती कर्मे करता येतात ? आणि कोणती करता येत नाहीत ?
आधी आरंभ केलेली कर्मे अधिक मासात पुढे चालवता येतात. उदाहरणार्थ यंदा श्रावण अधिक आहे. तुम्ही ज्येष्ठ मासात संकल्प करून आरंभलेले कर्म अधिक मासात पुढे चालवता येते; पण संकल्प करून नवीन कर्माचा आरंभ आणि आधीपासून चालू असलेल्या कर्माची समाप्ती अधिक मासात करता येत नाही.
पूजेचा लोप झाला किंवा मूर्ती भग्न झाली, तर तिची पुन:प्रतिष्ठा अधिक मासात करता येते. तसेच अनन्यगतिक कर्मांमधील गर्भाधानापासून अन्नप्राशन संस्काराचा काळ प्राप्त झाल्यास हे संस्कार अधिक मासात करता येतात. येथे मेख आहे. केवळ गर्भाधानापासून अन्नप्राशन, म्हणजे उष्टावण इथपर्यंत संस्कार या काळात करता येतात. उपनयन म्हणजे मुंज आणि विवाह संस्कार करता येत नाहीत. गर्भाधान हा विवाह संस्कारानंतर वधूला जो प्रथम मासिक धर्म (रजस्वला) होतो, त्यानंतर हा संस्कार आहे. विवाह ज्येष्ठ मासामध्ये झाला आहे आणि विवाहोत्तर रजस्वला अधिक श्रावण मासात झाली, तर तेव्हा हा संस्कार करता येईल.
पुंसवन (गर्भवती स्त्री आणि होणारे बाळ हे शारीरिक अन् मानसिक दृष्ट्या सुदृढ रहावेत यासाठी करण्यात येणारा विधी), सिमंतोन्नयन (मन आणि बुद्धी या दोन्ही शांत अन् दृढ रहाण्याकरता, करण्यात येणारा ‘स्त्री संस्कार’ आहे) आणि अनवलोभन (गर्भपतन होऊ नये यासाठीचा संस्कार) हे संस्कार मातेच्या गर्भात बाळ असतांना विशिष्ट मासात करायचे असतात.
लौकीक भाषेत याला ‘आठांगुळ’ म्हणतात, हे अधिक मासात करता येतात; कारण तेथे काळ महत्त्वाचा आहे.
जन्माला आल्यावर जातकर्म नामकरण (बारसे) हेही विशिष्ट काळात (जन्मानंतर १२ व्या दिवशी) करणे आवश्यक आहे. त्यामुळे ते अनन्यगतिक आहेत. हे संस्कार करता येतात. एखाद्या व्यक्तीला ज्वर आला किंवा अन्य रोग उद़्भवले, तर त्या रोगाचा परिहार होण्यासाठी अधिक मासात शांतीकर्म करता येते.
काही विशेष योगावर ज्याला अलभ्य योग संज्ञा आहे, त्या योगावर होणारे श्राद्ध अधिक मासात करता येते आणि नैमित्तिक प्रायश्चित्त घेता येते. नित्य श्राद्ध, उनमासिकादी श्राद्धे (मासिक श्राद्धे), दर्शश्राद्ध (दर्श अमावास्येला करायचे श्राद्ध) अधिक मासात करता येते.’
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. (१५.७.२०२३)