ती पावले गुरूंची सदनात आज आली ।
ती पावले गुरूंची सदनात आज आली ।
तिमीरास चांदण्यांची बरसात आज झाली ॥ ध्रु. ॥
घेऊन समीर (वारा) आला, तो गंध कस्तुरीचा ।
आला प्रकाश आला, आल्हाद चंदनाचा ।
झाली कृतार्थता ती शिगेस आज गेली ॥ १ ॥
जागा मुळीच नाही, तेथे अमंगलास ।
स्वर्गीय त्या सुखाचा, होतो इथेच भास ।
सार्याच देवतांची गर्दी इथेच झाली ॥ २ ॥
लोहास आज जणू तो स्पर्शून परीस गेला ।
देहा सुवर्णरूपा देऊन तोच गेला ।
फेर्यांतूनीच (टीप) काया, माझीच मुक्त झाली ॥ ३ ॥
टीप : जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून
– श्री. सुधाकर देशपांडे (संदर्भ : मासिक ‘प्रसाद’, ऑक्टोबर २०००)