लोकसेवकांच्या संरक्षणासाठीच्या भादंवि. ३५३ (अ) चा दुरुपयोग, विधेयकात पालट होणार !
मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – लोकसेवकांच्या संरक्षणासाठी असलेल्या भारतीय दंड विधान ३५३ (अ) चा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे याविषयी सुधारित विधेयक आणावे, अशी मागणी २६ जुलै या दिवशी विविध पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या ३ मासांत यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
नाशिक येथील आमदार सुहास कांदे यांनी नाशिक शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईणकर यांनी खोटा गुन्हा नोंदवल्याची लक्षवेधी सूचना आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित केली. या प्रकरणी न्यायालयात केलेल्या याचिकेवरून न्यायालयाच्या निर्णयावरून माईणकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या वेळी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईणकर हे दबावतंत्राचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे नमूद करत या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत माईणकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल, अशी घोषणा सभागृहात केली.
लोकप्रतिनिधींवर नोंदवण्यात येणार्या खोट्या गुन्ह्यांविषयी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, आमदार देवयानी फरांदे यांनीही सूत्र सभागृहात उपस्थित केले. यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेसाठी वर्ष २०१७ मध्ये भा.दं.वि. ५३५ मध्ये सुधारणा करण्यात आली; मात्र लोकसेवकांसाठी ढाल म्हणून करण्यात आलेल्या या सुधारणेचा ‘तलवार’ म्हणून उपयोग केला जात आहे.