मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती करू ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – वर्ष २०१५ पासून वर्ष २०२२ पर्यंत मिठी नदीतील किती गाळ काढला ?, ठेकेदारांनी गाळ कोठे टाकला ?, बोगस पावत्या देण्यात आल्या का ?, त्याचे पैसे कुठे गेले ?, यामध्ये संबंधित अधिकारी गुंतलेले आहेत का ? हे समोर आणण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती करून चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २५ जुलै या दिवशी दिली. विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लक्षवेधीत सूचना मांडली होती. त्यावर उद्योगमंत्री बोलत होते.
मागील १७ वर्षांपासून मिठी नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १३०० कोटी रुपये व्यय करूनही नदी प्रदूषणापासून मुक्त झालेली नाही. शहराला पावसाळ्यात पुरापासून वाचवण्यासाठी मिठी नदीच्या पुनर्जिवितेचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात केली.