सिंहगडावर (पुणे) जाण्यासाठी उपद्रव शुल्क रोख स्वरूपात भरण्याची सक्ती !
सिंहगड (जिल्हा पुणे) – सिंहगडावर जाण्यासाठी वन विभागाकडून दुचाकीला ५० रुपये, तर चारचाकी वाहनास १०० रुपये उपद्रव शुल्क आहे. त्यासाठी वन विभागाने गोळेवाडी आणि घाट रस्त्यावरील कोंढणपूर येथे पडताळणी नाके उभारलेले आहेत. येथे हे शुल्क रोख रकमेमध्ये देण्याचा आग्रह धरला जात आहे. उपद्रव शुल्क रोख स्वरूपातच भरावे लागेल, असा आदेश आहे, असे सांगितले जाते. रोख रक्कम नसल्यास ‘ए.टी.एम्.’मधून पैसे काढा, असाही सल्ला कर्मचारी देतात.
याविषयी भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले की, कोंढणपूर फाट्याजवळ भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ची समस्या आहे. तरीही ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधा उपलब्ध करण्यास काही अडचण नाही. पुढील १० दिवसांमध्ये याविषयी कार्यवाही करू.