जीवनातील सुखासाठी मातेचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ ! – प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती
नगर – जीवनातील सुखासाठी मातेचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ असतो. साक्षात विष्णूचे अवतार असलेले प्रभु श्रीराम ज्या कैकयी मातेमुळे वनवासाला निघाले त्याच कैकयीचे आशीर्वाद घेतात. जन्मदात्या पित्यासह कौसल्यामातेचे आशीर्वाद घेतात. माता-पित्याच्या आज्ञेचे पालन प्रतिप्रश्न न करता करायचे असते, हे स्वकृतीमधून दाखवून देतात. आजच्या पिढीने हे शिकण्यासारखेच आहे, असे प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी सांगितले. येथील बडीसाजन मंगल कार्यालयात झंवर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचे तिसरे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. गणेश झंवर यांनी स्वागत केले.
प्रा. मधुसूदन मुळे म्हणाले, ‘‘प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी तपश्चर्येमधून प्राप्त केलेले आत्मज्ञान प्रसन्नपणे माताजींना प्रदान केले. अशा या माताजी आपल्या पुढ्यात श्रीरामकथेतील गूढ रहस्य ठेवत आहेत, हे आपल्या सर्वांच्या पूर्वसुकृताचेच फळ आहे.’’
अत्यंत रसाळपणे श्रीरामकथा निरूपण करतांना त्यातील विविध पदर उलगडून सांगण्याची प.पू. माताजींची वक्तृत्व शैली भाविकांना अधिक भावते आहे. सर्वश्री मोहनलाल मानधना, पै. गणेश कवडे, भगवान फुलसौंदर, पेमराज बोथरा, गोविंदजी जाजू, किशनजी राठी, संतोष तोडकर, डॉ. विजय भंडारी, राजेश भंडारी, सत्यनारायण गट्टाणी, बडिसाजन मंगल कार्यालयाचे संचालक, वनिता महिला मंडळ, लक्ष्मीनारायण सत्संग मंडळ, रामदेवबाबा भक्त मंडळ, एवॉन प्रिंटींग ग्रुप आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली.