पीक विमा योजनेत १ लाख शेतकर्यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील ! – भाग्यश्री फरांदे, कृषी अधीक्षक
सातारा, २६ (वार्ता.) – नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग या कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्रशासनाने खरीप हंगाम वर्ष २०२३ साठी ‘पंतप्रधान पिक वीमा योजना’ पुढे चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे. राज्यशासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्यातील शेतकर्यांसाठी राबवण्याचा निर्णय घेऊन केवळ एक रुपयांत अधिसूचित पिकास विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सातारा जिह्यातील ३६ शेतकर्यांनी सहभाग नोंदवला आहे. या योजनेत एक लाख शेतकर्यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील असून ३१ जुलैपर्यंत शेतकर्यांनी या विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
कृषी अधीक्षक फरांदे पुढे म्हणाल्या, ‘‘योजनेमध्ये कर्जदार तसेच विनाकर्जदार शेतकर्यांना सहभागी होता येईल. खरीप हंगामातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, खरीप कांदा अशा एकूण ९ पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकर्यांना सहभाग घेता येईल. वर्ष २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता रक्कम राज्यशासनाच्या वतीने भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना केवळ १ रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.’’
सौजन्य जाणीव मराठी
शेतकर्यांना ही योजना ऐच्छिक असल्याने त्यांना ज्या शेतातील अधिसूचित पिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा ७/१२ उतारा, खाते उतारा (८ अ) घेऊन ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरायचा आहे, तसेच सार्वजनिक सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालय, विमा कंपनीच्या संकेतस्थळावरूनही विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ७/१२ उतारा प्राप्त होत नसल्यास शेतात अधिसूचित पीक असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. पीक पेरणी न झाल्यासही विमा काढता येईल. त्यासाठी स्वयंघोषणापत्र देऊन पेरणीची संभाव्य तारीख त्यात नमूद करणे आवश्यक आहे. भातासाठी ४१ सहस्र रुपये प्रतिहेक्टर, खरीप ज्वारी २० सहस्र प्रतिहेक्टर, बाजरीसाठी १८ सहस्र प्रतिहेक्टर, नाचणी २० सहस्र प्रतिहेक्टर, भुईमूग ४० सहस्र प्रतिहेक्टर., सोयाबीन ३२ सहस्र प्रतिहेक्टर, मूग २५ सहस्र ८१७ प्रतिहेक्टर, उडीद २६ सहस्र प्रतिहेक्टर, खरीप कांदा ४६ सहस्र प्रतिहेक्टर, एवढी रक्कम विमा संरक्षित म्हणून दिली जाणार आहे. या योजनेत आतापर्यंत सातारा तालुक्यातून ४ सहस्र १५९, कोरेगाव १ सहस्र २०२, खटाव ७ सहस्र २२९, कराड ३ सहस्र १७६, पाटण १ सहस्र २२०, वाई १ सहस्र ४५०, जावली ६१७, महाबळेश्वर ७१, खंडाळा १ सहस्त्र ४५२, फलटण २ सहस्र ९०९, माण १० सहस्र ४९९ शेतकर्यांनी सहभाग घेतला आहे.