गोव्यातील १३८ सरकारी प्राथमिक शाळांमध्ये १० किंवा त्याहून अल्प विद्यार्थी
पणजी, २५ जुलै (वार्ता.) – प्रतिवर्ष सुमारे ८ ते १० सरकारी प्राथमिक शाळा बंद पडत आहेत. राज्यात सध्या ७०२ सरकारी प्राथमिक शाळा आहेत आणि यामधील १३८ शाळांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अल्प विद्यार्थी आहेत. विधानसभेत ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारलेल्या प्रश्नाला शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
१० किंवा त्याहून अल्प विद्यार्थी असलेल्या सरकारी प्राथमिक शाळांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. काणकोण – १७, सासष्टी – ४, केपे – १०, बार्देश – ९, तिसवाडी – १, सत्तरी – २३, धारबांदोडा – १९, मुरगाव – १, डिचोली – ११, फोंडा – १९, सांगे – ९ आणि पेडणे – १५ शाळा. यांमधील अनेक शाळांमध्ये ५ हून अल्प विद्यार्थी आहेत, तर काही मोजक्या शाळांमध्ये विद्यार्थीच नाहीत. सरकारी प्राथमिक शाळांच्या परिसरात खासगी शाळांना दिलेली अनुमती, सरकारी प्राथमिक शाळांचा दर्जा खासगी शाळांच्या तुलनेत खालावणे, मातृभाषेऐवजी इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेण्याकडे पालकांचा असलेला विशेष कल आदी अनेक कारणांमुळे सरकारी प्राथमिक शाळांची ही दु:स्थिती झालेली आहे; मात्र हल्ली सरकारच्या प्रयत्नांमुळे काही ठिकाणी अनेक सरकारी प्राथमिक शाळांची स्थिती पूर्वीच्या तुलनेत चांगली आहे.