शारीरिक स्थिती अत्यंत खालावलेली असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या कृतज्ञताभावात असणार्या उंचगाव (कोल्हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !
‘वर्ष २००५ मध्ये मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अध्यात्मप्रसाराची सेवा करत होते. तेव्हापासून उंचगाव (कोल्हापूर) येथील सनातन संस्थेच्या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांचा आणि माझा परिचय आहे. आमची पुष्कळ जवळीक होती. मधल्या काळात आमची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती; परंतु जवळीक तशीच आहे. अधूनमधून आमचा भ्रमणभाषवरून संपर्क होत असे. मागील वर्षी वैद्या सुजाता देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. त्यांच्याशी बोलतांना ‘त्यांना कर्करोग झाला आहे’, हे मला समजले. त्या वेळी आम्हा दोघींचे झालेले संभाषण, म्हणजे भाववृद्धी सत्संगच होता. त्या वेळची त्यांची स्थिती पाहून मला त्यांच्याविषयी आणि असे साधक गुरुदेवांनी सिद्ध केलेले आहेत; म्हणून गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. वैद्या सुजाता यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करते.
१. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांच्या झालेल्या भेटीच्या वेळी जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. स्वतःला कर्करोग झाला असल्याचे सहजपणे आणि त्रयस्थपणे सांगणे : वैद्या सुजाता यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांचे केस पुष्कळच आखूड (बॉय कट) केलेले दिसले. ते पाहून मी त्यांना विचारले, ‘‘एवढे आखूड केस का ठेवले आहेत ?’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘माझे केस किमोथेरपीमुळे (कर्करोगावरील औषधप्रणालीमुळे) गेले आहेत. त्यामुळे मी ‘बॉय कट’ केला आहे.’’ त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर मी निःशब्द झाले. मला एक मिनिट काही सुचले नाही. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या आजाराचा सविस्तर वृत्तांत सांगितला. तो सांगतांना त्या अत्यंत स्थिर आणि सहज होत्या. ‘जणूकाही त्या अन्य कुणाच्या आजारपणाचा वृत्तांत मला सांगत आहेत’, असे मला वाटले. त्या पुष्कळ स्थिर आणि आनंदी असल्यामुळे त्यांना पाहून कुणालाही ‘त्यांना कर्करोग झाला आहे’, असे वाटत नव्हते.
१ आ. वैद्या सुजाता यांच्या समवेतचा संवाद म्हणजे भाववृद्धी सत्संगच असणे : वैद्या सुजाता यांचे सर्व बोलणे भावाच्या आणि आध्यात्मिक स्तरावरील होते. त्यामुळे ते ऐकतांना कुठेही ‘रुग्णाईत साधकाच्या आजारपणाचा प्रवास ऐकत आहे’, असे मला वाटत नव्हते. त्या वेळी मनाच्या स्तरावर निराशा किंवा दुःख जाणवत नव्हते. बुद्धीने विचार केल्यावर त्यांना कर्करोग झाल्याविषयी मला दुःख झाले. वैद्या सुजाता भावस्थितीत असल्यामुळे मलाही त्या स्थितीत जाता आले. आमच्या संभाषणातील काही भावसूत्रे पुढे दिली आहेत.
१ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव
अ. वैद्या सुजाता यांना अल्प वयामध्ये कर्करोग होणे आणि जीवनात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होणे, यांमुळे त्यांच्या मनात कुठेही साधना किंवा गुरुदेव यांच्याविषयी विकल्प नव्हता. त्याऐवजी ‘सर्व प्रसंगांत गुरुदेव कशी काळजी घेत आहेत आणि त्यांनी प्रत्येक पावलावर कसे साहाय्य केले आहे ?’, हेच त्या सांगत होत्या. त्यांचा भाव पाहून माझाही भाव जागृत झाला. ‘केवळ महाविष्णूचा अवतार असलेल्या नारायणस्वरूप गुरुदेवांच्या कृपेमुळेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणे शक्य झाले आहे’, असे मला जाणवले.
आ. वैद्या सुजाता म्हणाल्या, ‘‘प्रारब्धामुळे मला कर्करोग होणारच होता; परंतु गुरुदेवांच्या कृपेमुळे मी उच्च शिक्षण (एम्.डी. आयुर्वेद) घेऊ शकल्याने मला चांगली नोकरी मिळाली. त्यामुळे या आजारपणात मला आर्थिक ताण आला नाही.’’ हे सांगतांना त्यांना गुुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘नोकरी केली नसती, तर आजारपणामध्ये एवढा खर्च करता आला नसता’, असे त्यांना वाटत होते.
इ. वैद्या सुजाता म्हणाल्या, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमुळे मला भविष्याची चिंता वाटत नाही. माझे मन शांत आणि स्थिर आहे. माझ्या मनात ‘शेवटच्या क्षणापर्यंत गुरुदेवांच्या चरणांजवळ रहाता येऊ दे’, असाच विचार असतो.’’ हे ऐकल्यानंतर ‘गुरुदेव साधकांची कशी काळजी घेत आहेत !’, असे वाटून मला गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटली.
१ इ. त्यांना सतत नामजपाची आठवण होते. याही स्थितीमध्ये त्यांच्या मनामध्ये ‘जेवढी सेवा करता येईल, तेवढी करूया’, असा विचार असतो.
१ ई. साधक रुग्णांची सेवा करण्याची तळमळ : वैद्या सुजाता देवद आश्रमामध्ये ४ दिवसांसाठी आल्या होत्या. त्या कालावधीतही ‘आश्रमामध्ये कुणी रुग्ण असतील, तर मी त्यांना तपासते. माझे साहाय्य झाले, तर बरे होईल’, असा त्यांचा भाव होता. ‘नंतरही कुणाला काही आवश्यकता असल्यास मला सांगा’, असेही त्यांनी सांगितले. यातून त्या स्वतः रुग्णाईत असतांनाही रुग्णसेवा करण्याची त्यांची तळमळ जाणवली.
२. सुश्री (कु.) सुजाता जाधव यांची प्रकृती पुष्कळ खालावलेली असतांना त्यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
८ दिवसांपूर्वी मला त्यांचा भ्रमणभाष आला होता. त्या वेळी झालेले आमचे संभाषणही वैशिष्ट्यपूर्ण होते. ‘जीवनामध्ये गुरुदेव आल्यानंतर त्या साधकाचा जीवनातील मृत्यूसारख्या प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन किती सकारात्मक असतो !’, हे वैद्या सुश्री सुजाता यांच्याकडून मला शिकायला मिळाले.
२ अ. स्वतःच्या खालावलेल्या शारीरिक स्थितीविषयी सांगतांना स्थिर असणे आणि ‘आता केवळ गुरुदेवांचेच स्मरण सतत राहू दे’, अशी इच्छा व्यक्त करणे : वैद्या सुजाता यांनी त्यांची सध्याची शारीरिक स्थिती सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘मला दिलेल्या किमोथेरपीचा काहीच उपयोग झाला नाही. माझे शरीर कोणत्याच औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही. बोलतांनाही मला दम लागतो. माझे वजन अल्प झाले आहे. माझ्या अन्य अवयवांनाही कर्करोगाची लागण झालेली आहे. सद्यःस्थितीमध्ये ‘माझी प्रकृती सुधारेल’, असे मला वाटत नाही, तरीही ‘प्रतिकारक्षमता वाढावी’, यासाठी जी काळजी घेणे शक्य आहे, तेवढी घेण्याचा मी प्रयत्न करत आहे.’’ हे सांगतांनाही त्या स्थिर होत्या. ‘आता केवळ गुरुदेवांचेच स्मरण सतत राहू दे’, असे त्या म्हणत होत्या.
२ आ. आजारपणातही इतरांचा विचार करणे : ‘आई, वहिनी, काकू यांना त्यांची सेवा करावी लागते’, याचे त्यांना वाईट वाटत होते. प्रत्यक्षात वैद्या सुजाता यांची शारीरिक स्थिती नाजूक आहे. इतरांना त्यांची सेवा करण्याविषयी काही अडचण नाही. त्या वेळी ‘वैद्या सुजाता इतरांचा विचार किती करतात !’, हे माझ्या लक्षात आले.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या भावामुळे मुलीच्या दुर्धर आजारपणातही स्थिर असणार्या श्रीमती उषा जाधव ! : वैद्या सुजाता यांच्या आई श्रीमती उषा जाधव यांच्याशी बोलल्यानंतर ‘त्याही पुष्कळ स्थिर आहेत’, असे मला जाणवले. सध्या त्या दोघी त्यांच्या गावी वैद्या सुजाता यांच्या काकांकडे आहेत. वैद्या सुजाता यांच्या आईने मला ‘त्यांचे दीर, जाऊ, पुतणे, सुना इत्यादी सर्व जण सुजाताची कशी काळजी घेतात ?’, हे सांगितले. ‘घरातील वातावरण पुष्कळ चांगले आहे. सर्व जण पुष्कळ प्रेमाने सुजाताची काळजी घेतात’, हे पाहून ‘आम्ही नातेवाइकांमध्ये नसून सनातनच्या आश्रमामध्येच आहोत’, असे त्यांना वाटते. ‘या स्थितीत गुरुदेव सर्व काळजी घेत आहेत. घरातील सर्व नातेवाईक कसे साहाय्य करतात ?’, हे सांगतांना त्यांचा गुरुदेवांविषयीचा भाव दाटून येत होता. ‘गुरुदेवांनी आणखी काय द्यायला हवे ?’, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या मनात कुठेच वैद्या सुजाता यांच्या आजारपणाविषयी निराशा किंवा नकारात्मकता नव्हती. ‘त्याही भावस्थितीतच आहेत’, असे मला जाणवले. अशा स्थितीत मनाने स्थिर राहून भावस्थितीत असणे’, हे केवळ गुरुदेवांच्याच कृपेमुळे शक्य आहे’, असे मला वाटले.
‘प्रतिकूल परिस्थितीमध्येही वैद्या सुजाता आणि त्यांच्या आई यांच्यामध्ये असणारी भावस्थिती आम्हा सर्व साधकांमध्ये येवो’, हीच गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना ! ‘आम्हाला अशा साधकांचा सत्संग दिला’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.७.२०२३)