दैवी बालिका कु. प्रार्थना पाठक, कु. अपाला औंधकर आणि कु. शर्वरी कानस्कर !
‘कु. प्रार्थना पाठक आणि कु. अपाला औंधकर या दोघी जणी दैवी बालके अन् दैवी युवा साधक यांचा सत्संग घेतात. पूर्वी कु. प्रार्थना रामनाथी आश्रमात राहून साधना करत होती. ती देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावरही तिला ‘ती रामनाथी आश्रमातच आहे’, असे जाणवत असे. अन्य २ दैवी बालिकांनाही तिच्याविषयी असेच जाणवले. त्याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
१. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १२ वर्षे), पुणे सेवाकेंद्र
१ अ. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे निर्गुणातून अस्तित्व जाणवणे आणि ‘रामनाथी आश्रम हृदयातच आहे’, असे जाणवणे : ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर तेथेही ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, असे मला जाणवत होते. त्या आश्रमात गेल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे निर्गुणातून अस्तित्व जाणवत होते. मला प्रत्येक क्षणी गुरुदेवांचे स्मरण व्हायचे आणि ‘ते प्रत्येक क्षणी माझ्या जवळ आहेत’, असे वाटत होते. ‘रामनाथी आश्रम हा केवळ गोव्यात नसून तो माझ्या हृदयातच आहे’, असे मला वाटत होते आणि मी जेथे जाईन, तेथे मला आश्रम दिसत होता.’
२. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. दैवी सत्संगाची सेवा करतांना ‘कु. प्रार्थना रामनाथी आश्रमातच आहे’, असे जाणवणे : ‘मी कु. प्रार्थनाच्या समवेत दैवी सत्संगाची सेवा करते. कु. प्रार्थना रामनाथी आश्रमात नसल्याने आम्ही भ्रमणभाषवरून दैवी सत्संगाची सूत्रे निश्चित करतो. कु. प्रार्थना आणि मी भ्रमणभाषवर ‘ऑनलाईन’ सेवा करत असतांना ‘ कु. प्रार्थना रामनाथी आश्रमातच आहे’, असे मला अनेक वेळा जाणवायचे. तिचा आणि माझा सेवेनिमित्त प्रतिदिन संपर्क होत असे. ती दूर असली, तरीही मला तिच्याकडून सतत शिकता येत असे. त्याबद्दल माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’
३. कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. ‘कु. प्रार्थना ‘ऑनलाईन’ सत्संगात सूत्रे सांगत असतांना ती ‘ऑनलाईन’ सत्संग घेत नसून ‘ती आमच्या जवळ एका आसंदीवर बसून सत्संग घेत आहे’, असे मला जाणवत असेे.’
४. कृतज्ञता
‘हे प्राणप्रिय गुरुदेवा, तुमच्याच कृपेमुळे आम्हाला कु. प्रार्थनाची वैशिष्ट्ये अनुभवता आली’, त्याबद्दल आम्ही आपल्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |