केवळ स्वयंपाकघर नव्हे, हे तर एक औषधालयच !
आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नामध्ये जे जे घटक मिसळलेले असतात, त्यात कोणता ना कोणता औषधी गुणधर्म नक्कीच असतो. म्हणूनच आपली भारतीय पाककला ही आरोग्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. आता हे घटक कोणते आणि त्यांचा औषधी उपयोग कसा करायचा ? हे आपण आजच्या लेखांमध्ये समजून घेत आहोत. या माहितीचा उपयोग किरकोळ आरोग्याच्या तक्रारीवर घरच्या घरी सोपे इलाज करण्यासाठी आपण करू शकतो. किरकोळ आरोग्याच्या तक्रारींवर असे घरगुती उपचार करण्यास काहीच हरकत नसते; परंतु सर्वांनी एक महत्त्वाचे सूत्र येथे लक्षात घ्यायला हवे की, एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असल्यास त्याने पूर्णपणे याच घरगुती उपचारांवर अवलंबून रहाणे चुकीचे आहे. हे उपचार प्राथमिक स्वरूपाचे आहेत. तेव्हा तारतम्याने या माहितीचा उपयोग आपण विकार निर्मूलनासाठी करावा.
१९ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण धने, ओवा, लवंग, जायफळ,दालचिनी यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्या अंतिम भागात काळी मिरी, बडीशेप, आले, सुंठ आदींसह अन्य पदार्थांची माहिती येथे देत आहे.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/702776.html |
एक-दोन दिवसांत घरगुती उपचारांचा परिणाम आपल्याला न दिसल्यास केवळ त्यांवर अवलंबून न रहाता वैद्यांचा योग्य समादेश (सल्ला) घेणे आवश्यक आहे. |
१०. काळी मिरी
अ. काळी मिरी अतिशय उष्ण असते, त्यामुळे त्या पित्त वाढवतात. म्हणून काळी मिरीचा समावेश आहारामध्ये करतांना आपली प्रकृती, आपल्याला होणारा त्रास आणि ऋतू यांचा विचार करणे आवश्यक आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीला मिर्यांचा लगेच त्रास होणार नाही; परंतु पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना मात्र मिरी खाल्ल्यावर लगेच पित्ताचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये किंवा शरद ऋतूमध्ये आपल्या आहारात मिरी अत्यल्प प्रमाणात असाव्यात.
आ. कफ झाला असल्यास अथवा सर्दीमध्ये चिमूटभर मिरेपूड मधासह चाटल्याने कफ पातळ होतो.
११. बडीशेप
अ. बडीशेप ही थंड गुणधर्माची आहे. त्यामुळे ती पित्त न्यून करणारी आहे.
आ. लहान मुलांमध्ये पोट फुगणे, पोट दुखणे इत्यादींवर बडीशेपचा अर्क ५ ते १० मि.ली. दोन्ही जेवणापूर्वी दिल्यास लगेच आराम मिळतो.
इ. खोकल्यावर बडीशेपचे चूर्ण आणि अर्धा चमचा खडीसाखरेसह दिल्यास खोकल्याची येणारी उबळ न्यून होते.
ई. बाळंतीणीला प्रतिदिन बडीशेप दिल्याने लाभ होतो.
१२. आले आणि सुंठ
अ. आले आणि सुंठ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे आहेत. कंद ओला असल्यास त्याला ‘आले’ म्हणतात आणि तो वाळवल्यानंतर अन् त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ‘सुंठ’ सिद्ध होते. उष्ण असल्याने उन्हाळा आणि शरद ऋतूत आले अन् सुंठ यांचा वापर करू नये.
आ. आल्याच्या रसापासून वेलची, जायफळ, जायपत्री आणि लवंग ही द्रव्ये घालून सिद्ध केलेला आलेपाक भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, सर्दी अन् खोकला यांवर उत्तम कार्य करतो.
इ. अपचन झाले असता पाव चमचा आल्याच्या रसात, चिमूटभर सैंधव मीठ आणि थोडे लिंबू पिळावे. जेवणापूर्वी हे मिश्रण थोडेसे चाटल्याने तोंडाला चव येते आणि पचन सुधारते.
ई. खोकल्यावर पाव चमचा आल्याचा रस मधासह चाटायला द्यावा. (यामध्ये प्रमाण फार महत्त्वाचे आहे; कारण उपचार माहिती असतील आणि प्रमाण माहिती नसेल, तर त्याचा लाभ न होता अपायच अधिक होतो. एकदा एका रुग्णाला पुष्कळ कफ झाला. त्यावर त्याच्या नातेवाईकांनी घरगुती उपचार म्हणून रुग्णाला अर्धी वाटी आल्याचा रस आणि मध दिले होते. त्या रुग्णाला कफावर त्याचा उपयोग तर झाला नाहीच, उलट उष्णतेच्या त्रासाने तो रुग्ण हैराण झाला. म्हणून इथे नमूद करावेसे वाटते की, आपल्याला पूर्ण माहिती नसलेले उपचार आपण रुग्णावर करायला नको. अशा वेळी वैद्यांचा सल्ला घेतला असता, तर रुग्णाला त्रास झाला नसता.)
१३. चिंच
अ. चिंच आंबट चवीची आहे. कच्ची चिंच उष्ण आहे. त्यामुळे पित्त वाढवते. पिकलेली चिंच सुद्धा उष्णच असते; पण अपक्व चिंचेच्या तुलनेत लाभदायी असते.
आ. भूक नसेल, अन्न पचत नसेल, तोंडाला चव नसेल, मळमळणे, अंगाचा दाह होत असेल, तर पिकलेल्या चिंचेचे सरबत अतिशय लाभदायक ठरते.
चिंचेचे सरबत बनवण्याची कृती :
आ १. पेलाभर सरबत बनवण्यासाठी १ पेला पाणी, पिकलेली चिंच पाण्याच्या पाव प्रमाणात घ्यावी.
आ २. रात्रभर चिंच पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी चिंच कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे.
आ ३. त्यात चवीनुसार खडीसाखर, काळे मीठ, चिमूटभर मिरे पूड घालावी आणि साखर विरघळेपर्यंत ढवळावे.
आ ४. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे आपण चिंचेचे सरबत केल्यावर त्याचे गुणधर्म पालटतात. त्यामुळे फक्त चिंच खाल्ली तर पित्त वाढते, पण चिंचेचे सरबत घेतल्यास मात्र पित्ताने होणारा दाह कमी होतो.
१४. कोकम
अ. कोकणात याला ‘रातांबे’ म्हणतात. यामध्ये कच्च्या आणि पिकलेल्या फळाचे गुणधर्म वेगळे आहेत. पिकलेले फळ हे उत्तम पित्तशामक आहे. म्हणून कोकम सरबत पित्त न्यून करणारे
आहे. पित्त वाढल्याने शरिराचा दाह होत असेल, तर कोकम सरबत घ्यावे.
आ. अंगावर पित्ताच्या गांधी (त्वचा लाल चट्टे येणे आणि पुरळ) उठल्या असतील, तर त्यावर कोकमाचे पाणी किंवा कोकम आगळ (कोकमाचा रस) लावावे.
इ. कोकमाच्या बियांपासून तेल निघते. हे तेल त्वचा रोग, त्वचा कोरडी असणे, ओठ कोरडे पडणे, पायांना भेगा पडणे यांवर उपयुक्त आहे.
ई. आव होत असेल, तर कोकम तेल चमचाभर घेऊन त्यात थोडी पिठीसाखर घालून खावे. आव पडणे न्यून होते.
१५. खजूर
अ. चवीला गोड आणि थंड गुणधर्माचे असे खजूर उष्णता आणि पित्त न्यून करणारे आहे.
आ. पुष्कळ जुलाब, उलट्या झाल्यानंतर शरिरातील पाणी न्यून होते. त्यामुळे थकवा, चक्कर, डोळ्यांसमोर अंधारी येणे असे होते. अशा वेळी लगेच तरतरी येण्यासाठी खजूर पाण्यात थोडा वेळ भिजवून ते कुस्करून घ्यावे. ते पाणी पिल्याने लगेच तरतरी येते.
इ. शरिरात लोह अल्प असल्यास आहारात खजुराचा समावेश अवश्य करावा.
अशा प्रकारे आपण मागील ३ लेखांमध्ये स्वयंपाकघरातील विविध घटकांचे गुणधर्म आणि औषधी उपयोग वाचले. याचा उपयोग आपल्याला प्राथमिक उपचार करण्यासाठी होईलच, तसेच यावरून आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार, आपल्याला होणार्या त्रासानुसार कोणते पदार्थ आपण खायला हवेत ? आणि कोणते खाऊ नयेत ? हेही लक्षात येईल. आपल्या स्वयंपाकात बहुतांशी उष्ण पदार्थ आहेत. त्यामुळे ज्या भाज्या आपण खातो, त्या पचवण्यासाठी आपल्याला हे पदार्थ साहाय्य करत असतात; पण त्या पदार्थांचे योग्य प्रमाण असणे फार महत्वाचे आहे.
(समाप्त)
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (२३.७.२०२३)