‘साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू इत्यादी सर्वांची साधना व्हावी’, यांसाठी ‘स्व’भान विसरून सतत प्रयत्नरत असलेल्या सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर (वय ३४ वर्षे) !
‘गुरुकृपेने मला सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर यांचा सहवास लाभला. त्यांच्या समवेत रहातांना मला त्यांची समष्टीप्रती असलेली तळमळ प्रकर्षाने जाणवली. त्यांच्याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करत आहे.
१. गुरुकार्याचा ध्यास !
१ अ. तहान-भूक हरपून सेवा करणे : पू. दीपालीताई तहान-भूक हरपून सेवा करतात. गुरुसेवेमध्ये त्यांनी ‘स्व’चे अस्तित्वच ठेवलेले नाही.
१ आ. शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करून सेवारत रहाणे : पू. दीपालीताई यांना काही वेळा शारीरिक त्रास होत असतो, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून त्या सेवेसाठी अखंड धडपडत असतात.
२. स्थिरता
पू. दीपालीताई सर्वच सेवा दायित्वाने, कुशलतेने, स्थिर राहून आणि दृढ श्रद्धेने पार पाडतात. अनेक वेळा त्यांना एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. तरी त्या स्थिर राहून ‘सर्व सेवा योग्य प्रकारे होतील’, याकडे लक्ष देऊन सेवांचे नियोजन करतात.
३. साधकांना घडवणे
३ अ. साधकांना ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने वागण्याची जाणीव करून देणे : ‘तुम्ही सर्व जण आपापली सेवा करता; पण ‘हा माझ्या गुरूंचा आश्रम आहे’, हा भाव ठेवून, आपलेपणाने आणि ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने ‘आजूबाजूला कुठे काही अव्यवस्थित दिसत असेल, तर ते व्यवस्थित ठेवले पाहिजे’, अशी जाणीव पू. दीपालीताईंनी आम्हाला करून दिली.
३ आ. साधकांमध्ये पालट होण्यासाठी तत्त्वनिष्ठपणे साधकांना चुका सांगून त्यांच्याकडून स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करून घेणे : ‘साधकांची स्वतःमध्ये पालट करण्याची तळमळ वाढावी आणि त्यांचा उद्धार व्हावा’, यांसाठी पू. दीपालीताई पुष्कळ प्रेमाने अन् तळमळीने साधकांना स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व सांगतात. साधकांकडून होणार्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगून त्या साधकांकडून स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करून घेऊन त्यांची साधना करून घेतात. मला वाटते, ‘हीच त्यांची खरी प्रीती आहे.’ त्यांची प्रीती एखाद्या जिवामधे शाश्वत पालट घडवते. आम्हाला त्यांची अशी प्रीती क्षणोक्षणी अनुभवता येते.
३ इ. ‘साधकाला त्याची चूक लक्षात आणून देणे’, ही समष्टी साधनाच आहे’, असे समजावून सांगणे : एकदा माझ्यातील ‘प्रतिमा जपणे’, या तीव्र स्वभावदोषामुळे माझ्या लक्षात आलेली साधकांची चूक मी त्यांना सांगितली नाही. तेव्हा पू. दीपालीताई मला म्हणाल्या, ‘‘आपल्या लक्षात आलेली साधकांची चूक आपण त्यांना सांगू, तेव्हा आपली समष्टी साधना होईल आणि ती चूक साधकांच्या लक्षात येऊन त्यांचे त्यानुसार प्रयत्न होतील, तेव्हा त्यांची व्यष्टी साधना होईल.’’
३ ई. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मन जिंकण्यासाठी कष्ट घेतल्याशिवाय आणि संघर्ष केल्याविना पर्याय नाही’, हे साधकांच्या मनावर बिंबवणे : ‘गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मन जिंकण्यासाठी आणि त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी साधकांनी स्वभावदोष अन् अहं यांवर कठोरपणे मात केली पाहिजे. त्याच समवेत स्वतःमध्ये ईश्वरी गुणांची वृद्धी करण्यासाठी कष्ट आणि संघर्ष करण्याविना पर्याय नाही’, असे त्या साधकांच्या मनावर सतत बिंबवतात.
३ उ. काही वेळा त्या एखादी कृती स्वतःच करून दाखवून साधकांना घडवतात.
४. ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी सेवांचे परिपूर्ण नियोजन करणे
४ अ. सेवाकेंद्रातील सेवांचे नियोजन करणे : पू. दीपालीताईंचे सेवाकेंद्रात सगळीकडे पूर्ण लक्ष असते. साधकांच्या अडचणी सोडवणे, त्यांना त्रास होत असेल, तर नामजपादी उपाय सांगणे, आवश्यक तिथे साधकांना साहाय्य देणे, सेवांचे नियोजन करणे, सत्संग घेणे इत्यादी सर्व गोष्टी त्या बारकाईने लक्ष देऊन करतात.
४ आ. वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी इत्यादी सर्वांची साधना व्हावी’, यासाठी उपक्रम आणि इतर सेवा यांचे नियोजन करणे : त्या ‘साधक, वाचक, धर्मप्रेमी, हितचिंतक, युवा साधक आणि बालसाधक’, अशा सर्वांची साधना व्हावी’, यासाठी अखंड तळमळत असतात. सर्वांचा सेवेत सहभाग वाढावा, सेवेच्या माध्यमातून ते सतत सत्मध्ये रहावेत आणि त्यांची साधना व्हावी’, यासाठी पू. दीपालीताई उपक्रम आणि इतर सेवांचे परिपूर्ण नियोजन करून देतात. त्यांच्या ध्यानी-मनी केवळ सर्व जिवांचा उद्धार व्हावा’, अशी तळमळ असते. त्यासाठी त्या सतत गुरुदेव आणि कृष्ण यांना आर्ततेने हाक मारतात. यातून त्यांच्यातील व्यापकताही दिसून येते.
५. भाव
‘भाव कसा असावा ?’ किंवा ‘तो कसा असतो ?’, हे पहायचे किंवा अनुभवायचे असेल, तर पू. दीपालीताईंकडे पहावे. भावाचे मूर्तीमंत उदाहरण, म्हणजे पू. दीपालीताई ! पू. दीपालीताई सत्संगात किंवा साधकांशी प्रत्यक्ष बोलतात, तेव्हा त्यांच्या वाणीतील गोडव्यातून भाव अवतरीत होतो. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये जणू प्रत्यक्ष भगवंतच अवतरतो. पू. दीपालीताई, म्हणजे चालता-फिरता भावच आहे !
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्ही या अज्ञानी आणि क्षुद्र जिवाला संतसहवासात रहाण्याची संधी देऊन या जिवाचे जीवनच पालटून टाकले आहे आणि या जिवाचा उद्धार करत आहात’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता ! ‘मला तुम्हाला अपेक्षित असेच साधनेचे प्रयत्न करता येवोत’, अशी तुमच्या चरणी आर्त प्रार्थना !’
– कु. वैष्णवी (पूजा) दसाडे, सोलापूर सेवाकेंद्र. (१०.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |