लाभात असलेल्या बससेवा रत्नागिरी विभागाला चालवता येत नसतील, तर अन्य विभागांकडून चालवाव्यात !
|
दापोली – येथील बसस्थानकातून यापूर्वी चालवण्यात येणार्या सकाळी ५.३० वाजता परळी, ७ ची शिर्डी, ९ ची अक्कलकोट आणि दुपारी ४.३० वाजता सुटणारी मिरज-विजापूर या बसफेर्या उत्पन्न अल्प मिळत असल्याचे दाखवून कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट रत्नागिरी येथील एस्.टी. चे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी चालवला आहे. लाभात असलेल्या या बससेवा रत्नागिरी विभागाला चालवता येत नसतील, तर बीड, नगर, सोलापूर आणि मिरज विभागांकडून या बसेस चालवण्याची मागणी प्रवासी संघटना शेगांवचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी एस्.टी.च्या वरिष्ठ अधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की,
१. दापोली-शिर्डी, दापोली-अक्कलकोट, दापोली-अंबाजोगाई परळी, वैजनाथ या बससेवा चालू करण्यात याव्यात, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येत आहे; मात्र विभाग नियंत्रक बोरसे आणि विभागीय वाहतूक नियंत्रक सचिन सुर्वे हे बससेवा चालू करणार्या प्रवाशांना त्यांचे म्हणणे कसे खोटे आहे ? आम्हीच कसे खरे आहोत ? हे दाखवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
२. सद्या चालू असलेल्या या बस उत्पन्न नसल्याचे दाखवून बंद करण्यात आल्या आहेत.
३. सकाळी ७ ची दापोली-शिर्डी ही बस सध्या चालू असून त्यामुळे दुसरी बस चालू करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती विभागीय नियंत्रक प्रज्ञेष बोरसे आणि विभागीय वाहतूक नियंत्रक सचिन सुर्वे यांनी वैभव बहुतुले यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
४. दापोली-शिर्डी बससेवा ही बस निमआराम (सेमी) केल्यापासून पुणेपर्यंत चालवली जात आहे.
५. दापोली-शिर्डी साध्या बसला जे उत्पन्न येत होते, ते निमआराम बस पुणेपर्यंत चालवूनही मिळत नसल्याने निमआराम बस चालवून काय लाभ झाला ? हेही मंडळाने सांगावे.