अभिषेक पूजेवरील कर अल्प करावा, तसेच अभिषेक पूजेची संख्या वाढवण्यात यावी !
पुजारी मंडळाचे श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानला निवेदन
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २५ जुलै (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी प्रतिदिन सहस्रो भाविक येतात. देवीला अभिषेक पूजा हा भाविकांच्या आस्थेचा विषय आहेे; मात्र मंदिराच्या वाढीव करामुळे, तसेच अभिषेक संख्या अल्प केल्यामुळे सर्वसामान्य भाविक अभिषेक पूजेपासून वंचित रहात आहेत. त्यामुळे अभिषेक पूजा कर ५० रुपयांवरून २५ रुपये करण्यात यावा, तसेच अभिषेक पूजेची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी पुजारी मंडळाने मंदिर संस्थानकडे केली आहे.
मागणीचे निवेदन मंदिर देवस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार संतोष पाटील यांनी स्वीकारले. निवेदनावर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, सर्वश्री धीरज जाधव, बाळासाहेब भोसले, चिन्मय मगर, किशोर मगर, दत्ता सोमाजी, अमोल ताकमोघे, महेश अमृतराव, विशाल रोचकरी आदी पुजार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.