पुणे येथे पोलिसांच्या ५ सहस्र सदनिकांचे काम १५ वर्षे रखडले, पैशाच्या अपहाराप्रकरणी होणार अन्वेषण !
मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – पुणे जिल्ह्यातील लोहगड येथे वर्ष २००८ मध्ये पोलिसांसाठी ५ सहस्र २४८ सदनिका बांधण्याचे काम चालू करण्यात आले; मात्र मागील १५ वर्षे हा प्रकल्प रखडला आहे. गृहरचना बचाव कृती समितीने केलेल्या मागणीवरून बांधकाम करणार्या बी.ई. बिलीमोरीया या आस्थापनाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी चालू आहे. या प्रकरणी शासनाचे उपनिबंधकाद्वारे आस्थापनाचे लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये पैशाचा अपहार झाल्याचे समोर आले, तर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जुलै या दिवशी विधानसभेत सांगितले. या प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.
याविषयी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘वर्ष २०१८ मध्ये पर्यावरण विभागाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. कोरोनाच्या काळात प्रकल्पाचे काम रखडले होते. सद्यस्थितीत काम अत्यंत संथगतीने चालू आहे. काम असेल चालू राहिले, तर हे काम काही वर्षांत पूर्ण होईल, असे वाटत नाही. या प्रकरणात पोलिसांच्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामध्ये पोलिसांचे पैसे अडकले आहेत. हे काम लवकर कसे होईल, यासाठी सरकारकडून प्रयत्न चालू आहेत.’’