गोव्यात गेल्या ६ मासांत सरकारी पाहुणचारावर ३ कोटी ८० सहस्र रुपये खर्च
पणजी, २४ जुलै (वार्ता.) – विधानसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून सरकारी पाहुणचारावर वर्ष २०२३ मध्ये जानेवारी ते जून या ६ मासांत सरकारी पाहुण्यांवर ३ कोटी ८० सहस्र रुपये खर्च झाल्याची माहिती शिष्टाचार खात्याकडून उघड झाली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव आणि आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रश्नावरील लेखी उत्तरात शिष्टाचारमंत्री गोविंद गावडे यांनी ही माहिती दिली.
गोव्यात आलेल्या सरकारी पाहुण्यांचा जेवण-खाण, हॉटेल आणि प्रवासाचा खर्च सरकारकडून केला जातो. हा खर्च वाटेल तसा केला जातो; म्हणून ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाते. हा सर्व खर्च सरकारच्या तिजोरीतून होतो. आमदार, मंत्री, विशेष निमंत्रित अशा सर्वांसाठी हा खर्च करण्यात येतो. याविषयीच्या लेखी उत्तरामध्ये दुपारचे जेवण रात्रीच्या जेवणापेक्षा अल्प खर्चाचे असते आणि रात्रीचे जेवण पुष्कळ महागडे असते, असे म्हटले आहे. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने सरकारी पाहुणे मोठ्या संख्येने गोव्यात येतात आणि पाहुणचार घेतात. ‘या सरकारी पाहुण्यांसाठी मेजवान्या आयोजित केल्या जातात’, अशी माहिती या उत्तरातून समोर आली आहे.