गेल्या ६ मासांत गोव्यात एक दिवसाआड अमली पदार्थांविषयीच्या गुन्ह्याची नोंद
पणजी, २४ जुलै (वार्ता.) – वर्ष २०२३ मधील गेल्या ६ मासांत गोव्यात एक दिवसाआड अमली पदार्थांविषयीच्या गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षी ६ मासांत एकूण ८१ गुन्ह्यांची नोंद झाली असून गेल्या वर्षी ही संख्या ५५ होती. गेल्या ६ मासांत अमली पदार्थविरोधी पथकाने जवळजवळ ८४ किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. ३० जून २०२३ पर्यंत गोवा पोलिसांनी अमली पदार्थ बाळगण्याच्या गुन्ह्याखाली एकूण ९१ जणांना अटक केली आहे. यांपैकी २५ जण गोमंतकीय आणि ६० जण परप्रांतीय आहेत.
पोलिसांच्या संमतीविना अमली पदार्थ येणे शक्यच नाही ! – आलेक्स रेजिनाल्ड
अमली पदार्थांच्या गुन्ह्यांविषयी आमदार आलेक्स रेजिनाल्ड विधानसभेत म्हणाले, ‘‘पोलीस त्यांचे काम व्यवस्थितपणे करत नाहीत. अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या सहकार्याविना अमली पदार्थ शहरात येणे शक्यच नाही. पोलीसदेखील या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत. जे यात गुंतले आहेत, त्यांना कारागृहात टाका. कुठल्याही मतदारसंघात अमली पदार्थ येता कामा नयेत. राज्यात अमली पदार्थ येणे थांबवले नाही, तर राज्याचे भवितव्य चांगले नाही. सायबर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सामान्य माणसे विविध ऑनलाईन घोटाळ्यांमध्ये पैसे गमावत आहेत. अशा सायबर गुन्हेगारांवर पोलीस कारवाई का करू शकत नाहीत ?’’