मुबलक आरोग्यपूर्ण पदार्थांचा साठा असतांना टोमॅटोची आवश्यकता आहे का ?
१. कोणत्या आजारांत टोमॅटो खाऊ नये ?
सर्दी, खोकला, सांधेदुखी, सूज, डोकेदुखी, अम्लपित्त (अॅसिडिटी), वाढलेले ‘युरिक अॅसिड’ (आपल्या शरिरातील एक प्रकारची घाण की, जी मूत्रमार्गाने शरिरातून बाहेर काढली जाते), वाढलेले ‘क्रिएटिनिन’(शरिरात बनणारा नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ की, जो मूत्रमार्गाने शरिरातून बाहेर काढला जातो), मूत्रपिंडाचे आजार (किडनी स्टोन वगैरे), अॅलर्जी, त्वचा विकार.
२. टोमॅटोला पर्याय आहे का ?
पर्याय आहे. अनुमाने १५ वर्षांपूर्वी टोमॅटोचा इतका वापर नव्हता. पंजाबी पदार्थांमुळे टोमॅटोचा रस्सा (ग्रेव्ही) हा प्रकार आला. नाही तर कोकम, चिंच, लिंबू क्वचित् आमचूर यांवर आमचे पदार्थ छान बनत होतेच ! कोकम, चिंच, लिंबू, आमचूर
या घटकांचे लाभ पुढीलप्रमाणे :
२ अ. चिंच : यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर आहे. चिंचेमुळे पोट साफ होते आणि पचन सुधारते. तसेच मोठ्या आतड्यांचे आरोग्य सुधारते अन् त्यांची हालचाल (peristalsis) नियमित करते. सांधेदुखी असणार्यांनी चिंचेची चटणी खाऊ नये; पण स्वयंपाकातील चिंच चालते.
२ आ. कोकम : वजन आणि कोलेस्ट्रॉल (रक्तातील एक घटक) न्यून करते, हृदयाचे कार्य आणि पचनक्रिया सुधारते. तसेच अम्लपित्तावर वरदान असून अंगावर पित्त उठणे न्यून होते.
२ इ. लिंबू : ‘क’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. तसेच हे पाचक असून वजन न्यून करण्यात उपयोगी आहे. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
२ ई. आमचूर : कफ न्यून करते, वारंवार होणार्या मूत्रप्रवृत्तीला थांबवते आणि सांध्यांना मजबूती देते.
२ उ. कैरी आणि आवळा : वरील ४ जिन्नसांखेरीज ऋतुनुसार उपलब्ध कैरी आणि आवळा यांचा वापरही आपण स्वयंपाकात आवर्जून करा. कैरी ही पाचक आहे, तर आवळ्यामुळे ‘क’ जीवनसत्त्वाचा उत्तम पुरवठा होतो. आवळा पाचक आणि अम्लपित्त नाशक आहे, तसेच शरिरातील नवीन पेशी बनवण्यास साहाय्य होते.
एवढा मुबलक आरोग्यपूर्ण साठा असतांना टोमॅटोची आवश्यकता काय ? कधी तरी पावभाजी आणि छोले बनवतांना वापरा; पण प्रतिदिन नको !
– वैद्या चंदाराणी बिराजदार, एम्.डी., आयुर्वेद