रामायण आणि महाभारत हे राज्य, व्यवहार अन् युद्ध शास्त्रांचे शिक्षण देणारे महान ग्रंथ !
आपल्यावर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा पगडा एवढा आहे की, एखादी गोष्ट योग्य कि अयोग्य ? हे ठरवायचे असेल, तर स्वतःची मन आणि बुद्धी पाश्चात्त्य जगताकडे वळते. त्यांच्या मोजपट्टीने आपण स्वतःला तोलतो वा मोजतो, हे शतप्रतिशत मूर्खपणाचे लक्षण आहे. मी असे का म्हणतो ? ते अगदी सकारण स्पष्ट करणार आहे.
१. प्रा. मॅक्समुलर यांचा हिंदुस्थानकडे अध्यात्माच्या दृष्टीने बघण्याचा दृष्टीकोन
प्रा. मॅक्समुलर याने प्रथम हिंदु संस्कृती बुडवण्यासाठी तिला विकृत करण्याचे काम केले; पण नंतर त्याला योग्य मार्ग सापडला आणि त्याने स्वतःच्या चुका सुधारल्या. त्याने ‘इंडिया व्हॉट इट कॅन टिच अस ?’ (India what it can teach us ?) हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात मॅक्समुलर लिहितो, ‘‘कोणत्या आकाशाखाली माणसाने विकास केला ? जीवनाच्या मूलभूत प्रश्नांचा सखोल अभ्यास केला आणि त्याच्या काही प्रश्नांची उत्तरे शोधून काढली. ज्यांच्याकडे प्लेटो, अॅरिस्टॉटल यांच्यासारख्या अभ्यासकांनी लक्ष द्यावे, असा मला प्रश्न विचारला, तर मी हिंदुस्थानकडे बोट दाखवीन.
ज्या ग्रीक, रोमन, तसेच सेमेटिक वंशाच्या ज्यूंच्या साहित्यावर आपले पोषण झाले आहे, त्या लोकांनी आत्मिक जीवन परिपूर्ण व्हावे, सर्वांगीण व्हावे, शाश्वत जीवनासाठी कोणत्या साहित्याचा अभ्यास करावा ? असे मला विचारण्यात आले, तर मी पुन्हा हिंदुस्थानकडे बोट दाखवीन.’’
२. अमेरिकेचे माजी राजदूत ब्लॅकवेल यांचा हिंदुस्थानविषयीचा आदरभाव
अमेरिकेचे माजी राजदूत ब्लॅकवेल यांचा एक लेख ‘एशियन एज’च्या २२ एप्रिल २००३ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध झाला. त्या लेखात त्यांनी ‘अमेरिकन साहित्याचा जनक’ म्हणून ओळखला जाणारा मार्क ट्वेन हिंदुस्थानविषयी काय म्हणतो ? ते त्यांनी त्यांच्या लेखात मांडले आहे. ते पुढीलप्रमाणे, ‘‘हिंदुस्थान हा मानवी वंशाचा पाळणा आहे. मानवी शब्दांची जन्मभूमी आहे. इतिहासाची माता आहे. दंतकथांची आजी आहे. परंपरेची पणजी आहे. मानवी इतिहासातील मौलिक आणि उद़्बोधक गोष्टी हिंदुस्थानात संग्रहित केल्या आहेत.’’
३. मराठी वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. कोलते यांनी वर्णिलेली संतांची महती
मराठी वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. कोलते म्हणतात, ‘‘संत टाळकुटे नाहीत. ते नाठाळांच्या माथी काठी हाणतात. मेणाहून मऊ असले, तरी प्रसंगी कठीण वज्राला भेदणारे आहेत. अमृताहून गोड असले, तरी विषाहून कडू होणारे आहेत. रंजल्या गांजलेल्यांना आपला मानणारे आहेत; पण दुसर्यांना त्रास देणार्यांना ताडन (शिक्षा) करणारे आहेत. भिक्षापात्र घेऊन जगाला साकडे घालणार्या लाजिरवाण्या जगण्याचा धिक्कार करणारे आहेत. नम्रतेने मुंगी होऊन साखर खाणारे; पण जगताचे आघात सोसण्याचे सामर्थ्य बाळगणारे आहेत. भूतमात्रांसमोर नम्र होणारे; पण शूरत्वाचे अंग जाणणारे आहेत. ते दूध पाजून सापाला पोसणारे नाहीत आणि देव्हार्यावर विंचू आला, तर त्या विंचवाला बाजूला करून चपलेने मारून मग देवाची पूजा करणारे आहेत.’’
४. वाली वधाच्या माध्यमातून प्रभु श्रीरामांनी दर्शवलेली रणनीती आणि मुत्सद्देगिरी
आपले अशा गोष्टींकडे लक्ष जात नाही. मुत्सद्देगिरीचा, व्यावहारिक चातुर्याचा आणि आंतरराष्ट्रीय डावपेचांचा विषय निघाला की, आपल्याला आठवतात ते मॅकॅव्हली, हॅरल्ड निकोल्सन, हॉब्स, लॉक, रुसो आणि अर्नेस्ट सातो हे पाश्चात्त्य ! पण आपल्याला श्रीराम, हनुमान आणि श्रीकृष्ण यांची आठवण होत नाही. श्रीरामाने वालीला लपून बाण का मारला ? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला रामायणात सापडते. त्यासाठी प्रभु श्रीरामांची रणनीती जाणून घेतली पाहिजे.
‘रावण आणि वाली यांच्यात करार झालेला होता’, ही गोष्ट श्रीरामांना ठाऊक होती. वाली आणि सुग्रीव या दोन भावांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. सुग्रीवावर वालीकडून झालेला अन्याय दूर करण्यासाठी श्रीरामांनी सुग्रीवाशी मैत्रीचा करार केला. त्याच वेळी प्रभु श्रीरामांनी सीतामाईंची रावणाच्या कह्यातून सुटका करण्यासाठी सुग्रीवाने श्रीरामांना सैन्यासह साहाय्य करायचे, असाही करार करण्यात आला.
किष्किंधा नगरीचा राजा वाली होता. ही नगरी अयोध्येच्या दक्षिणेला आहे. या नगरीच्या दक्षिणेला श्रीलंका आहे. श्रीलंकेवर रावणाचे राज्य आहे. रावणाला स्वतःची प्रतिमा ‘दक्षिणेकडील सम्राट’ म्हणून निर्माण करायची होती. त्यासाठी त्याने किष्किंधा नगरीवर स्वारी केली. वालीने त्याचा पराभव केला. त्यानंतर यांच्यात करार झाला. तो असा, ‘लंकेवर कुणी आक्रमण केले, तर किष्किंधा नगरीने लंकेला लष्करी साहाय्य करावे, तसेच किष्किंधा नगरीवर कुणी आक्रमण केले, तर लंकेने किष्किंधा नगरीला लष्करी साहाय्य करावे.’ यानुसार सुग्रीव आणि वाली या दोन भावांमध्ये युद्ध झाले, तर तो किष्किंधा नगरीचा अंतर्गत प्रश्न झाला. ती अंतर्गत बंडाळी झाली. अशा वेळी लंका मध्यस्थी करणार नाही किंवा लष्करी साहाय्य करणार नाही; पण प्रभु श्रीरामांनी जर उघडपणे या दोन भावांच्या संग्रामात सहभाग घेतला असता, तर लंका आणि किष्किंधा हे दोन देश विरुद्ध श्रीराम अन् लक्ष्मण या दोन व्यक्तींमध्ये युद्ध झाले असते. ते टाळण्यासाठी श्रीरामांनी दोन भावांमधील कलहात लपून हस्तक्षेप केला. त्यांनी झाडाच्या मागे लपून वाली वर शरसंधान केले आणि वालीचा वध केला.
वालीच्या मृत्यूनंतर सुग्रीव किष्किंधा नगरीचा राजा झाला. त्यामुळे ‘नव्या राजाने जुना करार पाळला पाहिजे’, असे बंधन नाही; म्हणून तो जुना करार (रावणाने वालीशी केलेला करार) नवा राजा येताच मोडीत निघाला. श्रीरामांनी सुग्रीव राजा होण्याआधीच त्याच्याशी करार केला होता. तो करार सुग्रीवाने राजा झाल्यावर पाळणे, हे त्याच्यावर बंधन होते. श्रीरामाने गुप्तपणे सुग्रीवाशी केलेल्या मैत्रीच्या कराराला वालीच्या वधानंतर प्रकाशात आणले. श्रीरामांच्या या रणनीतीला आजच्या आधुनिक भाषेत ‘चातुर्याचे तंत्र’ (Stratigic Deception) म्हणतात.
५. हनुमान आणि छत्रपती शिवराय यांनी अवलंबलेले ‘लबाडीचे तंत्र’
हनुमान सीतामाईंचा शोध घेण्यासाठी लंकेत गेले आणि लंका जाळून आले; पण लंकेत जातांना हनुमानाला दोन मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. प्रथम हनुमानाची गाठ ‘नागमाता सुरसा’ नावाच्या राक्षशिणीशी पडली. त्या वेळी संकट मोठे आहे, हे ओळखून हनुमानाने लहान रूप धारण केले, म्हणजे नम्रता दाखवली आणि स्वतःची सुटका करून घेतली.
(छत्रपती शिवराय यांनी अफझलखानाला ठार मारले, तसेच आगर्याहून निसटून जाण्यासाठी शिवरायांनी आजारपणाचे सोंग घेतले. दोन्ही वेळेस छत्रपती शिवरायांनी प्रभु श्रीराम आणि हनुमान यांच्या रणनीतीचे तंत्र कौशल्याने उपयोगात आणले.)
६. भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाच्या वधाच्या माध्यमातून दाखवलेला ‘धोरणात्मक संयम’
भगवान श्रीकृष्णाने लपून बसलेल्या जयद्रथाला बाहेर आणण्यासाठी सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. हे सैनिकी डावपेचातील चातुर्यच होते. सामान्यपणे चातुर्याचे तंत्र (स्टॅ्रटेजिक डिस्पेशन) म्हटले की, ट्रोजन हॉर्स, Achilles Heel, गॉर्डियन नॉट (Gordian knot) यांची आठवण होते, हे संदर्भ आठवतात; पण श्रीकृष्ण आठवत नाही. कधी कधी योग्य संधीची वाट पहावी लागते. त्याला रणनीतीच्या भाषेत ‘धोरणात्मक संयम’ (Strategic Patience) म्हणतात, तर कधी परस्परावलंबनही असते. त्याला इंग्रजी भाषेत ‘इंटरडिपेंडन्स’ (Interdependence) म्हणतात. या दोन्हीचा उपयोग श्रीकृष्णाने शिशुपाल वधाच्या वेळी केला.
शिशुपाल हा वसुदेवाची बहीण श्रुतश्रवाचा पुत्र, तर श्रीकृष्ण वसुदेवाचा पुत्र, म्हणजे शिशुपाल आणि श्रीकृष्ण हे परस्परांचे आतेभाऊ अन् मामेभाऊ होते. श्रुतश्रवा ही श्रीकृष्णाची आत्या होती. वसुदेवाची दुसरी बहीण म्हणजे कुंती ! कुंतीचे पुत्र पांडव हे श्रीकृष्णाचे आतेभाऊ होते. शिशुपाल हा पूर्वजन्मीचा रावण. या शिशुपालाचा रावणाच्या आधीचा जन्म म्हणजे हिरण्यकश्यपु या तिन्ही जन्मात त्याचा देवानेच वध केला.
‘शिशुपालाचा वध कृष्णाच्या हातून होणार’, हे श्रुतश्रवाला ठाऊक होते; म्हणून तिने श्रीकृष्णाला सांगितले, ‘श्रीकृष्णाने शिशुपालाच्या १०० अपराधांची क्षमा करावी.’’ श्रीकृष्णाने आपल्या आत्याची अट मान्य केली आणि तिला तसे वचन दिले. श्रीकृष्णाने हे वचन अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने पाळले. याला म्हणतात, ‘परस्परावलंबन’ (इंटरडिपेंडन्स) ! शिशुपालाकडून १०० अपराध घडल्यानंतरच श्रीकृष्णाने त्याचा वध केला, म्हणजे शिशुपालाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने शिशुपालाकडून शंभर अपराध होईपर्यंत प्रतीक्षा केली. १०० वा अपराध होताक्षणी श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला.
७. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाचे नियम मोडण्यास सांगण्यामागील कार्यकारणभाव
आज-काल ‘रूल्स बेस्ड ऑर्डर’ (Rules Based Order), म्हणजे ‘नियमांना अनुसरून आज्ञा’ याला महत्त्व आले आहे; पण रामायण-महाभारत काळात नियमाला अनुसरून झालेल्या आज्ञेचे पालन केले जात होते. महाभारतातील कौरव-पांडवांच्या युद्धात दुर्योधन आणि कर्ण यांनी त्या वेळचे युद्धाचे नियम धाब्यावर बसवले अन् युद्ध केले. पांडव मात्र काटेकोरपणे नियमांचे पालन करत होते. कौरवांनी नियम धाब्यावर बसवल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनालाही नियम मोडण्यास भाग पाडले. त्या वेळी कर्णाने श्रीकृष्णाच्या समोर नियम आणि नैतिकता यांचा पाढा वाचला. त्याला उत्तर देतांना श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘द्रौपदीचे वस्त्रहरण करतांना तुला नियमांची, नैतिकतेची आठवण झाली नाही. अभिमन्यूला मारतांना तुला नैतिकता आणि नियम यांचे स्मरण झाले नाही. आता तुला नैतिकतेची आणि नियमांची आठवण होते आहे का ?’’
८. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने युद्ध रणनीतीत युधिष्ठिराची प्रतिष्ठा पणाला लावणे
द्रोणाचार्य यांचा अतुलनीय पराक्रम आणि त्यांचा रुद्र अवतार यांसमोर पांडवांची सेना हतबल झाली. द्रोणाचार्यांना जोपर्यंत आपण शस्त्र खाली ठेवण्यास भाग पाडत नाही, तोपर्यंत पांडवांची सेना वाचणार नाही; म्हणून श्रीकृष्णाने ‘अश्वत्थामा मेला’, अशी अफवा पसरवली. ‘अश्वत्थामा मेला’ याची खात्री करून घेण्यासाठी द्रोणाचार्य युधिष्ठिरालाच विचारतील, हे श्रीकृष्णाने ओळखले होते; म्हणून श्रीकृष्णाने युधिष्ठिराला ‘अश्वत्थामा मेला’, असे बोलण्यास सांगितले. ‘अश्वत्थामा मेला’, अशी वार्ता द्रोणाचार्यांच्या कानावर पडताच सत्यता पडताळून पहाण्यासाठी त्यांनी युधिष्ठिराची साक्ष घेतली. युधिष्ठिराने ‘नरो वा कुंजरोवा’ (अश्वत्थामा नावाची व्यक्ती कि हत्ती मेला ?, हे ठाऊक नाही), असे सांगताच द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले आणि दृष्टद्युमनाने त्यांचा शिरच्छेद केला. द्रोणाचार्यांना मारण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या रणनीतीत युधिष्ठिराची ‘प्रतिष्ठा पणाला’ लावली. आजच्या युद्धशास्त्राच्या परिभाषेत त्याला इंग्रजीत भाषेत ‘रेप्युटेशनल कॉस्ट’ (Reputational Cost) म्हणतात.
९. युद्धशास्त्रात वापरले जाणारे डावपेच म्हणजेच ‘लष्करी कौशल्य’ !
श्रीकृष्ण, श्रीराम आणि हनुमंत कोणत्याही दबावाला कधीही फसले नाहीत; पण कौरव-पांडवांच्या युद्धाच्या आरंभी अर्जुन बंधनाला (Constraint) फसला. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. युधिष्ठिराला आपल्या गुरूंशी खोटे बोलावे लागले, म्हणजेच ‘अश्वत्थामा मेला’, असे खोटे सांगावे लागले. युद्धशास्त्रात या डावपेचाला ‘लष्करी कौशल्य’ (Tactical Adjustment) असे म्हणतात.
१०. भारतीय सैन्याकडून रामायण आणि महाभारत यांच्या परंपरेला महत्त्व
रामायण, महाभारत हे राज्य, व्यवहार आणि युद्ध या शास्त्रांचे शिक्षण देणारे महान ग्रंथ आहेत. त्या दृष्टीने आपण या ग्रंथांकडे कधी पाहिले नाही, हा आपला अपराध आहे. तथापि आपल्या सैन्यदलाला मात्र रामायण आणि महाभारत यांचा अभिमान आहे. ‘कारगिल युद्धाच्या वेळी काय घडले ?’, ते सांगणारे वृत्त ‘इंडिया टुडे’च्या ५ जुलै १९९९ या दिवशीच्या अंकात ‘टेकिंग टोलोलिंग’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. त्यात टोलोलिंगच्या अखेरच्या आक्रमणासाठी जी रणनीती आखण्यात आली तिच्यासाठी ३ तुकड्या नियोजित करण्यात आल्या. त्या ३ तुकड्यांची नावे ‘अभिमन्यू’, ‘भीम’ आणि ‘अर्जुन’ अशी ठेवण्यात आली होती. आपला ‘निधर्मी’ (सेक्युलर) देश असला, तरी या ३ तुकड्यांची नावे ‘अमर’, ‘अकबर’ आणि ‘अँथनी’ अशी ठेवण्यात आली नाहीत. त्याऐवजी भारतीय सेनाधिकारी महाभारताकडे वळले; कारण त्यांना आपल्या रामायण आणि महाभारत या परंपरेचा अभिमान आहे. ‘We are what we were, we shall be what we are.’ (आपण जे होतो तेच आहोत, जे आहोत तेच राहू.) ‘राष्ट्राच्या निर्मितीत परंपरेला महत्त्व असते’, हे वरील ३ नावांनी दाखवून दिले. या नावातच ‘हिंदुत्व’ आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२३.७.२०२३)