अवैध व्‍यवसायांमध्‍ये कुणालाही पाठीशी घालणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

पोलीस अधिकार्‍यांचा सहभाग असल्‍यास बडतर्फ करू !

देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – राज्‍यात ‘ऑनलाईन गॅम्‍बलिंग’ (जुगारहोत असल्‍यास त्‍यावर निश्‍चित कारवाई केली जाईल. तथापि जे ऑनलाईन खेळ खेळले जातात ते ‘गेम ऑफ स्‍कील’ (कौशल्‍याचे खेळ) स्‍वरूपात असल्‍यास त्‍यांना अनुमती असते. त्‍यावर कारवाई करता येणार नाही. सभागृहात दिलेल्‍या माहितीची शहानिशा करून अवैध व्‍यवसाय चालवणारे आढळून आल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल. कुणालाही पाठीशी घालणार नाही. पोलीस अधिकारी यात सहभागी असतील, तर कलम ३११ नुसार त्‍यांना बडतर्फ करण्‍यात येईल, असे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंबंधीचा प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात अवैध व्‍यवसाय चालू असल्‍याविषयी विरोधी पक्षनेत्‍यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून चौकशी करण्‍यात आली असून चौकशीत पोलीस प्रशासनाकडून अनधिकृत वसुली करण्‍यात येत असल्‍याविषयी निष्‍पन्‍न झाले नाही, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

हिंगोली जिल्‍ह्यातील अवैध व्‍यवसाय बंद करण्‍याविषयी मोहीम हाती घेऊन कार्यवाही केली जाईल. त्‍यासाठी ‘मकोका’ अथवा ‘एम्.पी.डी..’ कायद्यांतर्गत कारवाई करू, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले. या अनुषंगाने झालेल्‍या चर्चेत सदस्‍य सर्वश्री भाई जगताप, अभिजित वंजारी, अधिवक्‍ता अनिल परब, श्रीमती प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.

 तरुण पिढी वाईट मार्गाला जाईल, अशा खेळांचे विज्ञापन न करण्‍याचे आवाहन !

 भारतरत्न सचिन तेंडुलकर गुटखा किंवा तत्‍सम जाहिराती करत नाहीत. ज्‍या खेळांमुळे तरुण पिढी वाईट मार्गाला जाऊ शकते अशा खेळांची अथवा गुटख्‍यासारख्‍या पदार्थांचे विज्ञापन करावे का ? याविषयी प्रसिद्ध व्‍यक्‍तिमत्त्वांनी विचार करावा, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.