‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करणारे आमदार अबु आझमी यांचे सदस्यत्व त्वरित रहित करा ! – सकल हिंदू समाजाचे निवेदन
कोल्हापूर – ‘वन्दे मातरम्’ या मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतीकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्वाचे बलीदान दिले. असे असतांना महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत ‘जगात कुणापुढेही मस्तक झुकवण्यास इस्लाम अनुमती देत नाही. आम्ही स्वतःच्या आईपुढेही नतमस्तक होत नाही. आम्ही केवळ अल्लाहला मानतो. त्यामुळे आम्ही ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, असे वक्तव्य करून भारताच्या राष्ट्रीय गीताचा घोर अवमान केला आहे. तरी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करणार्या आमदार अबु आझमी यांचे सदस्यत्व त्वरित रहित करावे, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले.
या प्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्कर, फेरीवाले संघटनेचे श्री. अर्जुन आंबी, उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपशहरप्रमुख श्री. शशी बिडकर, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे श्री. शरद माळी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, सर्वश्री साईराज पाटील, संदीप पाटील, विश्वजीत पाटील, आनंद कवडे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधान मंडळातील विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचा प्रारंभ ‘वन्दे मातरम्’ने होतो. महाराष्ट्र शासनाने दूरभाषवर बोलतांना प्रथम वन्दे मातरम् असे बोलावे, असा स्तुत्य निर्णय घेतला आहे. असे असतांना इस्लामच्या आड भारतमातेला वंदन करण्यास नकार देणार्या धर्मांधांनी मातृभूमीशी केलेला हा कृतघ्नपणा आहे. स्वमाता असो किंवा भारतमाता असो, या मातांनी आपल्याला लहानाचे मोठे केले. काहीही अल्प पडू दिले नाही.
या वेळी करण्यात आलेल्या मागण्या१. वन्दे मातरम् भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून घोषित आहे. याला विरोध करणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद होईल, असा कायदा या पावसाळी अधिवेशनात संमत करावा. २. मातृभूमीच्या कृतज्ञतेपोटी वन्दे मातरम् गीत म्हणणे सक्तीचे करावे. यामुळे समाजात देशभक्ती वाढण्यास साहाय्य होईल. |
संपादकीय भूमिका‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करणार्यावर गुन्हा नोंद करणारा कायदा लवकरात लवकर पारित करावा, असे राष्ट्रभक्तांना वाटते ! |