चिपळूण येथील पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांना ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार प्रदान
सोलापूर – येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुण्यातील हरित मित्र परिवार लोक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदान करण्यात येणारा ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार २४ जुलै या दिवशी चिपळूण येथील पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक श्री. धीरज वाटेकर यांनी विद्यापीठ सभागृहात कुलगुरु डॉ. राजनीश के. कामत यांच्या हस्ते स्वीकारला.
या वेळी व्यासपिठावर कोल्हापूर क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याच्या हरित मित्र परिवार लोक विद्यापिठाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे, निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक, विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर्.के. वडजे, प्र. कुलगुरु जी.एस्. कांबळे आणि कुलसचिव योगिनी घारे उपस्थित होत्या.
या वेळी श्री. धीरज वाटेकर म्हणाले की, आमच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला, आम्ही ज्या शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले त्या रत्नागिरी जिल्ह्यातील मो.आ. आगवेकर विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय, अलोरे, ता. चिपळूणचे मुख्याध्यापक विभाकर वाचसिद्ध आणि आमचे दहावीचे वर्गशिक्षक राहिलेले शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक, निवृत्त मुख्याध्यापक अरुण माने सर यांनी आवर्जून उपस्थित राहून आम्हाला सुखद धक्का दिला.
अहिल्यादेवींनी केलेले पर्यावरणीय कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करूया !
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सह्याद्री वाहिनीशी संवाद साधतांना श्री. धीरज वाटेकर यांनी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पर्यावरणनीती आजही मार्गदर्शक, असल्याचे नमूद केले. त्यांनी वृक्षलागवडीसाठी दिलेले प्रोत्साहन, रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, लिंब, चिंच लावण्यासाठी प्रोत्साहन आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी शेती अन् जंगलामध्ये पशू-पक्षी प्राणी यांना स्वतंत्र क्षेत्र राखीव केल्याचे सांगितले. सामाजिक प्रदूषणावर उपाय शोधत अहिल्यादेवींनी केलेले पर्यावरणीय कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करूया, असेही त्यांनी सांगितले.
पर्यावरणाविषयी गांभीर्याने पावले उचलायला हवीत !
देशातील तब्बल १४७ जिल्ह्यांना भू-स्खलनाचा धोका असल्याचा अहवाल ‘इस्रो’ने दिला आहे. त्यात महाराष्ट्रातील ११ जिल्हे आहेत. गावांचा विचार करता कोल्हापुरातील १३३, सातारा १३४, नाशिक १२८, नगर १३१, सिंधुदुर्ग ११४, रत्नागिरी १२९, मुंबई १४० आणि मुंबई उपनगरातील १३९ ठिकाणांचा समावेश आहे. वेळ हातून निसटते आहे, पर्यावरणाविषयी आपण सर्वांनी गांभीर्याने पावले उचलायला हवीत.