अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
रत्नागिरी, २४ जुलै – अमली पदार्थांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केली. एन्.सी.ओ.आर्.डी. अर्थात् अमली पदार्थविरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक २४ जुलैला घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह पुढे म्हणाले, पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीविषयी दक्ष रहावे. तशी माहिती मिळताच पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करावी. नशामुक्ती केंद्र स्थापन करण्यासाठी आणि शाळा, महाविद्यालयांकडून जनजागृती करावी. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी जनजागृती आणि कारवाई करण्याविषयी सूचना दिल्या.