आमदारांना असमान निधीवाटप करणे, हा जनतेवर अन्याय ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदारांना असमान निधीवाटप केले जात असल्याचे सूत्र उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. आमदारांना असमान निधीवाटप करणे, हा जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर अन्याय आहे. निधी वाटपाची रक्कम ही जनतेच्या करातून वसूल करून दिली जाते. ज्या मतदारसंघात निधी दिला नाही तेथील जनता कर भरत नाही का ? त्यांना विकासाचा अधिकार नाही का ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारकडून विरोधी पक्षांतील आमदारांना निधीवाटपातून डावलले जात असल्याचा आरोप केला.
Ambadas Danve | “सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे, नाहीतर…”; निधी वाटपावर अंबादास दानवेंची आक्रमक भूमिकाhttps://t.co/KWDLWJR6a4@iambadasdanve @AjitPawarSpeaks
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) July 24, 2023
महाविकास आघाडी सरकारला समान निधीवाटपाचा शहाणपणा का शिकवला नाही ? – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याला सडेतोड उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुख्यमंत्री असतांना आणि आतापर्यंत विधीमंडळात या विषयावर एकदाही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या स्वाक्षरीविना आमदारांना व्ययासाठी निधी देता येत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत एकाही विरोधी पक्षातील आमदारांना वाढीव निधी दिला नाही. त्यांनीच हा पायंडा पाडला. तेव्हाच्या सरकारला हा शहाणपणा शिकवला असता, तर आज विरोधकांवर ही वेळ आली नसती. आमच्यासमवेत जे आमदार आले नाहीत, त्यांनाही निधी दिला आहे. आमदारांना सरसकट निधी दिलेला नाही. दोन्ही सभागृहांतील आमदारांना समान निधी मिळण्याविषयी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल; मात्र कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असा प्रयत्न केला जाईल.