सेवाभावी वृत्तीने चालणार्या वास्तूंच्या व्यायसायिक भाड्यात सरकार कपात करणार !
मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – लोकप्रतिनिधींच्या निधीतून बांधण्यात येणार्या व्यायायशाळा, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक संघ आदी वास्तू सेवाभावी वृत्तीने चालवल्या जातात. त्यांना व्यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते. या भाडे आकारणीमध्ये कपात करण्याची मागणी भाजपच्या आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी २४ जुलै या दिवशी लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित केली. यावर मंत्री उदय सामंत यांनी याविषयी ‘येत्या ८ दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ’, असे आश्वासन दिले.
या वेळी उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनीही भाडेदर निवासीदराने आकरण्याची मागणी केली. आमदार अजय चौधरी यांनी भाडे वेळेवर न भरण्यास महानगरपालिकेकडून जप्तीची नोटीस काढण्यात येते. त्यामुळे सुधारित भाडेदर निश्चित करण्याची मागणी केली.
यावर उत्तर देतांना मंत्री उदय सामंत म्हणाले की, याविषयी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. हा केवळ नाशिक किंवा मुंबई महानगरपालिकेचा विषय नाही. राज्यातील सर्व महानगरपालिकांसाठी हा निर्णय घेण्यात येईल. विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यावर यावर तात्काळ बैठक घेण्यात येईल. यामध्ये शैक्षणिक आणि धर्मादाय हेतून चालवल्या जाणार्या वास्तूंविषयी सरकार योग्य ती दरनिश्चिती केली जाईल, असे सांगितले.