गोवा : डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर
गोव्यात पावसाचा कहर चालूच !
पणजी, २३ जुलै (वार्ता.) – राज्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. २३ जुलै या दिवशी अवघ्या ४ घंट्यांमध्ये दीड इंचांहून अधिक पाऊस पडला, तर दिवसभर जोरदार सरी चालूच राहिल्या. यामुळे डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तसेच गावांचा संपर्क तुटला आहे. बर्याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान विभागानुसार पुढील ४ दिवस पावसाचा जोर कायम रहाणार आहे.
गोवा – बेळगाव महामार्गावरील लोंढा येथे पूल खचला
गोवा-बेळगाव महामार्गावर लोंढा येथील एका पुलाचा भाग खचला आणि यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली.
आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम
घाटमाथ्यावर पाऊस जोरात चालू असल्याने गगनबावडा आणि आंबोली घाटांत दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. यामुळे राज्यात येणारा भाजीपाला, कडधान्य आणि दूध वाहतुकीवर काही अंशी परिणाम झाला. गोव्यात येणार्या पर्यटकांनाही याची झळ बसली.
म्हापसा येथे वाहतुकीवर परिणाम
धुळेर, म्हापसा येथे कृषी विभागाच्या शेतभूमीतील एक भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली. आनंदी अपार्टमेंटजवळ ही घटना घडली. या दुर्घटनेत विजेच्या तारांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने या भागातील वीजुपरवठा खंडित झाला. रस्त्यावरील झाड हटवल्यानंतर दुरुस्तीकाम करून वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात आला.
२४ घंट्यांत पावणेचार इंच पावसाची नोंद
राज्यात २३ जुलैला सकाळी ८.३० वाजेपर्यंत (आधीच्या २४ घंट्यांत) सरासरी पावणेचार इंच पावसाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक पाऊस डिचोली तालुक्यात पडला आहे. राज्यात पावसाने एकूण ८४ इंचांचा टप्पा पार केला आहे.
अनेक ठिकाणी झाडांची पडझड
कोलवाळ येथे एका घरावर झाड पडले. बोरी येथे दोन २ झाडे पडल्याने एका चारचाकीची हानी झाली. पेडणे येथे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीजवाहिन्या तुटल्या आहेत; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हरमल येथे पोलीस चौकीकडे जाणारी पायवाट वाहून गेली आहे. पिसुर्ले पंचायत क्षेत्रात एका घरावर पहाटे ३ च्या सुमारास झाड कोसळल्याने लाखो रुपयांची हानी झाली. दक्षिण गोव्यात बेताळभाटी येथे एका घरावर झाड कोसळल्याने ९५ सहस्र रुपयांची हानी झाली. सासष्टी तालुक्यात एकूण ४ ठिकाणी झाडे कोसळली, तर एका ठिकाणी घराची भिंत कोसळली.
ठाणे ग्रामीण आरोग्य केंद्राचे छप्पर उडाले
सत्तरी तालुक्यातील ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील ठाणे ग्रामीण आरोग्य केंद्राचे छप्पर उडाले. यामुळे पावसाचे पाणी आरोग्य केंद्रात घुसून मोठ्या प्रमाणात साहित्याची आणि केंद्राची हानी झाली आहे.
उणय आणि दूधसागर नदी यांनी ओलांडली धोक्याची पातळी !संततधार कोसळणार्या पावसामुळे निरंकाल आणि दाभाळ गावांतून वहाणार्या उणय नदीने, तसेच कोडली, दावकोण, धुलेय, कुंभारवाडा, शिग्नेव्हाळ आदी गावांतून वाहणार्या दूधसागर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सलग दुसर्या दिवशीही पेण्यामळ-निरंकाल भागातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने निरंकाल आणि दाभाळ गावांचा संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. यामुळे वाहनचालकांना धारबांदोडा मार्गे किंवा अन्य पर्यायी मार्गे लांब पल्ल्याच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. |