तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेची चेतावणी
तानसा धरण भरून वहाण्याची शक्यता !
ठाणे – जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने चालू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वहाण्याची शक्यता आहे. तानसा धरण ओसंडून वहाण्याची पातळी १२८.६३ मीटर टी.एस्.डी. इतकी आहे. २२ जुलैला ही पातळी १२६.६०२ मीटर टी.एस्.डी.हून अधिक झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील आणि नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, तसेच पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. धरणातून विसर्ग होत असतांना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, तसेच महसूल आणि पोलीस प्रशासन यांनी दक्ष रहावे, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आल्या आहेत.