अमरावती येथे ‘कलश जागृती यात्रे’त सनातनचा सहभाग
अमरावती, २३ जुलै (वार्ता.) – येथील साईनगर भागातील भक्तीधाम मंदिरात अधिक मासानिमित्त ‘जीव आनंद बहुउद्देशीय सेवा समिती’च्या वतीने २३ जुलै ते ३० जुलै या काळात श्री श्री रुद्र महायज्ञ आणि श्रीमद़् भागवद़्कथा सप्ताह यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने येथील शिव मंदिरातून यज्ञ जागृती कलश यात्रा काढण्यात आली होती. यात सनातनच्या साधकांनी सहभाग घेतला. शिवमंदिरातून कलश आणि भागवत ग्रंथाचे पूजन करून यात्रेचा प्रारंभ झाला.
या कलश यात्रेचा उद्देश ‘घराघरात यज्ञ व्हावे, गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्यात यावे आणि ‘संस्कृत भाषा हीच आपली संस्कृती आहे’ याचा प्रचार करणे हा आहे’, असे आयोजक श्री. प्रकाश सिरवानी यांनी या वेळी सांगितले.
कलश यात्रेत श्रीधाम वृंदावन येथील भागवत कथावाचक आचार्य श्री सुशील महाराज, यज्ञाचार्य आचार्य श्री अनुराग पाठक महाराज, श्री महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठानचे श्री १००८ पीठाधीश्वर श्रीशक्तीजी महाराज आणि शेकडो भाविक उपस्थित होते.