मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून लोकमान्य टिळक यांना अभिवादन !
मुंबई – लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त २३ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे ब्रिटिशांना ठणकावून सांगतांना तरुणांच्या मनात स्वातंत्र्यसंग्रामाचे चैतन्य निर्माण केले. ते तत्त्वचिंतक, पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांचे परखड लेखन आणि वाणी यांमुळे ब्रिटीश सत्तेला हादरे बसले. भारतातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध स्तरांवरील ऐक्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.